संतोष देशमुखांच्या भावाला धक्का लागला म्हणून मी बोललो; गोपीचंद पडळकरांसोबतच्या वादावर आव्हाडांचा खुलासा

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईतील विधानभवन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात बुधवारी (१६ जुलै) जोरदार खडाजंगी झाली. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर गुरुवारी (१७ जुलै) प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली बाजू मांडली आणि वादाचे कारण स्पष्ट केले.
संतोष देशमुखांच्या भावाला धक्का लागला
जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी विधानभवनाच्या गेटवर आपल्या गाडीचा दरवाजा जोरात उघडला, जो आमदार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना लागला. हा सत्तेचा माज आहे.
पडळकर म्हणाले की, कोणी माझ्या गाडीसमोर आलं तर मी असाच दरवाजा उघडणार. त्यांच्या गाडीचा दरवाजा मला नाही, तर धनंजय देशमुख यांना लागला, म्हणून मी त्यांच्याशी बोललो, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पडळकर यांनी विधानभवन परिसरात शिवीगाळ सुरू केल्याचा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.
“मंगळसूत्र चोर” टिप्पणीवर आव्हाडांचा खुलासा
आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर केलेल्या “मंगळसूत्र चोर” टिप्पणीवरही खुलासा केला. मी परवा ‘मंगळसूत्र चोर’ असं बोललो, याचा त्यांना राग आला. पण मी हे का बोललो? कारण पडळकर यांनी मला ‘अर्बन नक्षल’ आणि ‘मुसलमानांचा एक्स’ असे म्हणून वैयक्तिक टीका केली होती.
कोणावर वैयक्तिक टीका करत नाही, पण त्यांनी माझ्यावर केलेल्या टिप्पणीला मी उत्तर दिलं,” असे आव्हाड म्हणाले. त्यांनी पुढे आव्हान देताना म्हटले, “मी पंधरा-वीस कार्यकर्त्यांसह फिरत नाही, मी एकटा फिरतो. हिंमत असेल तर माझ्यावर गाडी घाला, माझा जीव घ्या.”





