पिंपरी, दि. 20 – पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील सर्वाधिक अत्याधुनिक श्री मोरया गोसावी क्रीडांगण केशवनगर, चिंचवड येथे उभारले. यासाठी सव्वा पाच कोटी रुपयांचा खर्च झाला. मात्र सोमवारी रात्री जेसीबीच्या साहाय्याने हे क्रीडांगण खोदण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरक्षणे ताब्यात नसल्याने तसेच काही ठिकाणी आरक्षणावर अतिक्रमण झाल्याने शहरात उद्याने व क्रीडांगणाची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यातही पावसाळ्यात क्रीडांगणावर पाणी साचत असल्याने क्रीडापट्टूंना त्याचा वापर करता येत नाही. ही समस्या लक्षात घेऊन केशवनगर, चिंचवड येथे पिंपरी चिंचवड महापालिकेने सव्वापाच कोटी रुपये खर्चून क्रीडांगण उभारले आहे. या क्रीडांगणात पावसाचे पाणी साचू नये म्हणून ते खोदून त्याखाली छीद्र असलेले पाइप टाकले आहेत. तसेच या पाइपमध्ये माती जाऊ नये म्हणून वेगळ्या प्रकारचे कापड त्यावर गुंडाळले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या क्रीडांगणावर पाणी साचले नाही.
या क्रीडांगणाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रवेशद्वार तसेच बाहेरील बाजूचे काम अद्याप बाकी आहे. मात्र शालेय क्रीडा स्पर्धा असल्याने क्रीडांगण खेळाडूंसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच या परिसरात उद्यान नसल्याने सकाळी परिसरात नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. क्रीडांगणाच्या बाहेर ओप जीम देखील आहे. तसेच कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कराटे, क्रिकेट तसेच ऍथलॅटीकचे खेळाडू येथे सरावासाठी येत असतात.
सोमवारी रात्री हे मैदान कुलूप लावून बंद असताना काहीजण जेसीबी घेऊन आले. त्यांनी क्रीडांगणाच्या मध्यभागी खोदकाम केले. मात्र ही बाब लक्षात येताच काही नागरिकांनी हे काम बंद पाडले. मात्र जमिनीच्या खाली टाकण्यात आलेल्या या पाइपचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता असतानाही मैदान उकरण्याचे हे काम करण्यात आले. यामुळे नागरिकांच्या मनात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जेसीबीच्या सहाय्याने मैदान उकरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे