श्रीहरिकोटा – भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो येत्या 14 जुलै रोजी बहुप्रतिक्षित चांद्रयान-3 मोहीम प्रक्षेपित करणार आहे. चांद्रयान-3 चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लॅंडिंग करण्यावर आहे. यापूर्वी, इस्रोने चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 या दोन मोहिमा सुरू केल्या होत्या, परंतु या दोन्ही मोहिमा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकल्या नाहीत. जर चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली, तर अंतराळ क्षेत्रात भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल. या मोहिमेला यश मिळण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची टीम तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आज गेली होती.
विशेष म्हणजे बालाजीच्या चरणी चांद्रयान 3 ची लहान प्रतिकृती अर्पण करण्यात आली. इस्रोच्या वैज्ञानिकांनी तिरुपती मंदिरात चांद्रयान ३ चं प्रतिकृती मॉडेलची पूजा केली. तसेच, भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थनाही केली. यावेळी, इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ हे देखील मंदिरात हजर होते.
इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते, चांद्रयान-3 मोहीम चांद्रयान-2 चा पुढचा टप्पा आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि विविध चाचण्या घेईल. यात प्रोपल्शन मॉड्यूल, लॅंडर आणि रोव्हर असेल. अभियानाच्या यशस्वितेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत. अल्गोरिदम सुधारण्यात आले आहेत. 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता हे मिशन श्रीहरिकोटा केंद्रातून उड्डाण करेल आणि जर सर्व काही योजनेनुसार झाले तर 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. या मोहिमेमुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लॅंड करणारा भारत हा जगातील चौथा देश बनणार आहे.
भारताची चांद्रयान 3 मोहिम सुरू होण्याआधी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची टीम तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आज गेली होती. चांद्रयान 3 शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर इस्रोच्या टीमने आज तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले.
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी होणार असून ते चंद्रावरण 23 ऑगस्ट रोजी उतरण्याची शक्यता आहे. याआधी 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान मोहिम अयशस्वी ठरली होती. तेव्हा पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाले होते. यानंतर पुन्हा चार वर्षांनी इस्रो चांद्रयान मोहिमेसाठी सज्ज झालं आहे.