नवी दिल्ली – गाझामधील एक मोठे भुयार शोधून काढल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे. गाझा आणि इस्रायलदरम्यानच्या व्यस्त सीमेजवळच हे भुयार आहे. या भुयाराचे प्रवेशद्वार इरेझ क्रॉसिंगपासून अवघ्या काही मीटर अंतरावर आणि इस्रायलच्या लष्करी तळाच्या अगदी जवळ आहे. तरीही याच भुयारातून हमासचे दहशतवादी ७ ऑक्टोबरला हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे इस्रायलच्या गस्तीवरच्या सुरक्षा दलांना कसे लक्षात आले नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
हे भुयार तब्बल ४ किलोमीटर लांबीचे असून अन्य बोगद्यांच्या नेटवर्कला ते जोडले गेलेले आहे. या बोगद्यातून कार देखील सहज जाऊ शकेल, इतकी याची रुंदी आहे. या बोगद्यातून वाहने, दहशतवाद्यांच्या वाहतुकीबरोबर ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याची तयारी सहज केली गेली असावी, असे इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे.
या बोगद्यामध्ये दहशतवाद्यांची शस्त्रे देखील सापडली आहेत. सध्याच्या घडीला गाझामधील हे सर्वात मोठे भुयार आहे. अशाच प्रकारची आणखीन दोन भुयारे सापडली असून तेथील दहशतवाद्यांना सैन्याने कंठस्नान घातले आहे. सध्या त्यांची लांबी मोजण्याचे काम सुरू असल्याचे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर ऍडमिरल डॅनिएल हगारी यांनी म्हटले आहे.
हे बोगदे काही ठिकाणी ५० मीटर खोल आहेत. तेथे वातानुकुलन यंत्रणा आणि वीजेचा पुरवठा देखील केला गेलेला होता. या बोगद्यांच्या बांधकामासाठी लक्षावधी डॉलर खर्च केले गेले असल्याचे सहज लक्षात येत असल्याचेही हगारी म्हणाले.
हमासच्या दहशतवाद्यांनी इरेझ सीमाभिंत रॉकेटने उडवून दिली होती आणि लष्करी तळावर हल्ला करून तेथील सुरक्षा रक्षकांचे अपहरण केले होते. ही रॉकेट देखील याच बोगद्यातून नेली असावीत. इरेझ सीमा भिंत उडवून दिल्यावर तेथूनच दहशतवादी इस्रायलच्या हद्दीत घुसले होते. या बोगद्याचे प्रवेशद्वार एका गॅरेजमध्ये होते. त्यामुळे इस्रायली ड्रोन आणि उपग्रहांमध्येही ते दिसू शकले नव्हते.
गाझामध्ये बोगद्यांचे मोठे नेटवर्क आहे, हे इस्रायलच्या सैन्याला माहिती होते. हे बोगदे शेजारील जॉर्डनला जोडले गेले आहेत आणि जॉर्डनमध्ये हमासला मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे या बोगद्यांमधून इस्रायलमध्ये घातक हल्ला केला जाऊ शकतो, हे का लक्षात आले नाही, असा प्रश्न आहे. देशाच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा दाखवला गेल्याबद्दल इस्रायलमधील राजकीय नेते आणि गुप्तहेर संस्थांवर सार्वत्रिक टीका झाली होती.