समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – श्रीगोंद्यातील राज्यभर गाजलेल्या दूधभेसळ प्रकरणातील “मलई’ श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांच्या डोक्याला “कलई’ बनल्याची कुजबुज आहे. या “मलई’च्या वाटपात “हेवेदावे’ उफाळून आल्यानेच “डीबी’ पथक बरखास्त झाल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगत आहे.
“प्रभात’ने आज (दि.17) प्रसिध्द केलेल्या “डीबी’ पथक बरखास्तीच्या बातमीची पोलीस वर्तुळात चांगलीच चर्चा पाहायला मिळाली.
शिवाय या बातमीमुळे “डीबी’ बरखास्त होण्याची संभाव्य कारणेही चर्चेत आली. त्यानुसार दूधभेसळ प्रकरणातील “मलई’चे असमान वाटप हे एक कारण चर्चेत येत आहे. त्याचबरोबर “महत्वाच्या’ सर्व प्रकरणांमध्ये “डीबी’ची चलती असल्याने “अन्य’ मंडळी काहीशी नाराज होती. विशेषतः “डीबी’कडील दूधभेसळीच्या प्रकरणाच्या तपासात मोठी “मलई’ निघाल्याची चर्चा होती.मात्र कनिष्ठ आणि वरिष्ठांची “खुशी’ डावलून स्वतःच “मलई’ खाण्याच्या प्रयत्नात पोलिसांमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे.
दूधभेसळ प्रकरणातील “मलई’ची चर्चा रंगल्यानंतर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणातील काही आरोपींची उलट तपासणी केली. यामध्ये त्या आरोपींकडून दूध भेसळीचा “भाव’ जाणून घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास थंडावल्यानंतर मागील पंधरवड्यात ही उलट तपासणी झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर आठच दिवसात “डीबी’ पथक बरखास्त करण्यात आले. यातून या “दूधभेसळ’ प्रकरणाचे “वेटेज’ आणि “डीबी’ बरखास्तीशी असलेला संबंध लक्षात येतो.
एकूणच, कर्मचारी संख्या कमी झाल्याने “डीबी’ बरखास्त केल्याचे कारण पोलीस अधिकाऱ्यांकडून पुढे केले जात असले तरी त्यांच्याच खात्यातील कर्मचाऱ्यांमधील चर्चा वेगळ्याच गोष्टी सांगत आहेत. त्यामुळे “डीबी’ बरखास्त होण्यामागे घटलेली कर्मचारी संख्या नव्हे तर दूधभेसळीतील “मलई’ वाटपात झालेली “कलई’ कारणीभूत असल्याची चर्चा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात रंगली आहे.
एकाला पुण्यात मिळाला फ्लॅट?
दूधभेसळ प्रकरणात एका “व्हाईट कॉलर’ व्यक्तीचे नाव चर्चेत होते. मात्र त्याला आरोपींच्या यादीतून बाहेर ठेवण्यासाठी एकाने तपासाच्या दिशेचा “भंग’ करण्याच्या बदल्यात पुण्यात एक “फ्लॅट’ पदरात पाडून घेतल्याची चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे. यावरून दूधभेसळ प्रकरणातुन किती “मलई’ निघाली याचा अंदाज येऊ शकतो.