IPL 2024 (LSG vs RR Match 44) : लखनौचा सामना टेबल टॉपर राजस्थानशी…! सामन्यावर केकेआरची राहणार नजर; जाणून घ्या, का?

IPL 2024, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Preview : आयपीएल 2024 चा 44 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (शनिवार,27 एप्रिल) संध्याकाळी 7.30 वाजता लखनौमध्ये एकना स्टेडियमवर खेळला जाईल. राजस्थान टेबल टॉपर आहे. म्हणजेच गुणतालिकेत ते पहिल्या स्थानावर आहे. राजस्थानने 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. जर लखनौचा संघ राजस्थानला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर तो केकेआरला मागे टाकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर येईल.
लखनौ सुपर जायंट्सने गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा घरच्या मैदानावर पराभव केला होता. सीएसकेचा या मोसमात घरच्या मैदानावरील हा पहिला पराभव ठरला. मार्कस स्टॉइनिसने त्या सामन्यात शतक झळकावले होते. त्याचवेळी, त्यांच्या शेवटच्या सामन्यात राजस्थानने मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून सहज पराभव केला होता. म्हणजेच दोन्ही संघ या सामन्यात विजयासह प्रवेश करतील.
हेड टू हेड रेकाॅर्ड…
लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. राजस्थानने यापैकी तीन तर लखनौनं 1 सामना जिंकला आहे. यावरून राजस्थान रॉयल्सचे वर्चस्व दिसून येते.
एकना स्टेडियमची खेळपट्टी
लखनऊमधील एकना स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली मानली जाते. मैदान मोठे असून चेंडू थेट बॅटवर येत नाही. लखनौच्या खेळपट्टीवर फिरकीपटू आपले कौशल्य दाखवत आले आहेत. वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला विकेट्स घेतल्या नाहीत तर पुढे त्यांना यश मिळवणे कठीण होते. पण फिरकीपटू येताच धावगती कमी होते. आता लखनौचे स्टेडियम पूर्वीपेक्षा फलंदाजीसाठी अधिक योग्य झाले असले तरी येथे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा करता येत नाही.
राजस्थानची ताकद फलंदाजी…
आयपीएल 2024 मधील पॉइंट टेबलमध्ये राजस्थान अव्वल असेल, तर त्यात संघाच्या फलंदाजांचा मोठा वाटा आहे. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. संजू आणि रायन या दोघांनी प्रत्येकी तीन अर्धशतकांसह 300 हून अधिक धावा केल्या आहेत. जोस बटलरही टॉप ऑर्डरमधील गोलंदाजांचा समाचार घेत आहे. या मोसमात 2 शतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे.
लखनौसाठी केएल राहुल महत्त्वाचा…
या मोसमात लखनौची फलंदाजी केएल राहुलभोवती फिरली आहे. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. राहुलने 8 सामन्यात 302 धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय निकोलस पुरनही दमदार फलंदाजी करत होता. मार्कस स्टॉइनिस आणि दीपक हुडाही लयीत आले आहेत. अशा परिस्थितीत हे तिघे राजस्थानच्या गोलंदाजांसाठी मोठी अडचण ठरू शकतात.
लखनौची गोलंदाजी आहे कमकुवत…
लखनौ सुपर जायंट्ससाठी या मोसमातील शोध म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीमुळे 7 एप्रिलपासून एकही सामना खेळू शकलेला नाही. या मोसमात मयंकने पदार्पण केले आणि पहिल्या दोन सामन्यात त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने दोन्ही सामन्यात प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पण, गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे त्याला त्याची संपूर्ण षटके टाकता आली नाहीत. लखनौला त्याची उणीव भासत आहे. यश ठाकूरने 7 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. पण, तो फलंदाजांना घाबरवणारा गोलंदाज नाही.





