Live Cricket Score, KKR vs LSG Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 च्या 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चा सामना लखनौ सुपरजायंट्सशी झाला. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. केकेआरला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण संघाने लखनौला हरवून त्यांनी पुनरागमन केले. मात्र, लखनौला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सचा सहज पराभव केला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने 26 चेंडू राखून विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य होते, मात्र श्रेयस अय्यरच्या संघाने अवघ्या 15.4 षटकांत 2 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
Notun bochorer shubh aarombho! 😇 pic.twitter.com/mgy1hNJkhZ
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 14, 2024
केकेआरकडून सलामीवीर फिल सॉल्टने सर्वाधिक धावा केल्या. फिल सॉल्टने 47 चेंडूत 89 धावांचे योगदान दिले. या फलंदाजाने आपल्या झंझावाती खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार मारले. फिल सॉल्टशिवाय कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर 38 चेंडूत 38 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले.
सुनील नरेन आणि अंगक्रिश रघुवंशी झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले असले तरी फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यर यांनी केएल राहुलच्या संघातील गोलंदाजांना एकही संधी दिली नाही आणि सहज सामना खिशात घातला. लखनौ सुपर जायंट्ससाठी मोहसीन खान हा यशस्वी गोलंदाज ठरला. या गोलंदाजाने 4 षटकात 29 धावा देत 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 7 गडी गमावून 161 धावा केल्या होत्या. लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली नाही कारण संघाची धावसंख्या 39 असताना टीमने क्विंटन डी कॉक (10) आणि दीपक हुडा (08) यांच्या विकेट्स गमावल्या. अशा परिस्थितीत कर्णधार केएल राहुलने 27 चेंडूत 39 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार खेचून संघाला पुन्हा एकदा संकटातून सोडवले. त्याच्याशिवाय आयुष बडोनीने 29 धावांचे तर झंझावाती फलंदाज निकोलस पुरनने 32 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून खूप तगडी गोलंदाजी होती कारण 6 पैकी 5 गोलंदाजांनी प्रत्येकी किमान एक विकेट घेतली.
लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पुरनने सर्वाधिक 45 धावा केल्या. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी शेवटच्या 3 षटकात 38 धावा केल्या. 17 व्या षटकानंतर संघाची धावसंख्या 126 धावा होती आणि धावगती पाहता संघ 150 धावांपर्यंतही पोहोचू शकणार नाही असे वाटत होते. मात्र अखेरच्या षटकांमध्ये पुरनच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर लखनौने 161 धावसंख्येपर्यंत मजल मारली.
केकेआरची तगडी गोलंदाजी…
कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवातीपासूनच तगडी गोलंदाजी होती. प्रथम वैभव अरोराने क्विंटन डी कॉकला बाद केले आणि काही वेळाने मिचेल स्टार्कने दीपक हुडाला स्वस्तात बाद केले. केकेआरच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्येही वर्चस्व गाजवले कारण गोलंदाजांनी लखनौच्या फलंदाजांमध्ये कोणतीही मोठी भागीदारी होऊ दिली नाही. आंद्रे रसेलने एक षटक टाकताना 16 धावा दिल्या, तरी त्याने एक विकेटही घेतली. त्याच्याशिवाय मिचेल स्टार्कने 3, वैभव अरोरा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट घेतली.