KKR vs LSG : लखनौच्या २१ वर्षीय पठ्ठ्याने कोलकाताला रडवलं! शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात KKR च्या तोंडचा घास हिरावला
KKR vs LSG : शेवटच्या षटकापर्यंत रंगला, ज्यामध्ये लखनौच्या युवा खेळाडू मुकुल चौधरीने केकेआरच्या तोंडचा घास हिरावून घेतला.

KKR vs LSG Mukul Choudhary Lucknow Super Giants won : आयपीएल २०२६ च्या १५ व्या सामन्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एक अभूतपूर्व थरार पाहायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यातील हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला, ज्यामध्ये लखनौचा युवा खेळाडू मुकुल चौधरीने केकेआरच्या तोंडचा घास हिरावून घेतला आणि एलएसजीला ३ गडी राखून विजय मिळवून दिला.
घरच्या मैदानावर १८१ धावांचे आव्हान दिल्यानंतर केकेआरचा विजय निश्चित वाटत होता, मात्र लखनौच्या मुकुल चौधरीने क्रिकेट विश्वाला थक्क करणारी खेळी खेळली. एकवेळ ७ बाद १२८ अशा अडचणीत असलेल्या लखनऊला मुकुलने केवळ २७ चेंडूंत नाबाद ५४ धावा कुटून अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. या वादळी खेळीत त्याने ७ गगनचुंबी षटकार खेचले.
Another day, another #TATAIPL thriller 🤩@LucknowIPL get over the line in a last-ball finish, courtesy of Mukul Choudhary’s heroics 🫡
Scorecard ▶️ https://t.co/ov5gAlAtPH #KhelBindaas | #KKRvLSG pic.twitter.com/VLthHCB8Cm
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2026
केकेआरने उभे केले होते १८१ धावांचे आव्हान –
प्रथम फलंदाजी करताना केकेआरची सुरुवात खराब झाली. फिन ॲलन (९) स्वस्त बाद झाला, पण कर्णधार अजिंक्य रहाणे (४१) आणि अंगकृष रघुवंशी (४५) यांनी डाव सावरला. शेवटच्या षटकांत कॅमेरून ग्रीन (३२*) आणि रोवमन पॉवेल (३९*) यांनी फटकेबाजी करत धावफलक १८१ पर्यंत नेला. लखनौकडून दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, सिद्धार्थ आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
हार मानलेल्या लखनौसाठी मुकुल ठरला ‘तारणहार’ –
𝗔𝗕𝗦𝗢𝗟𝗨𝗧𝗘𝗟𝗬 𝗦𝗘𝗡𝗦𝗔𝗧𝗜𝗢𝗡𝗔𝗟 😮
One word for this knock?
Scorecard ▶️ https://t.co/ov5gAlAtPH #TATAIPL | #KhelBindaas | #KKRvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/euZOaEGtu2
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2026
प्रत्युत्तरात १८२ धावांचा पाठलाग करताना लखनौची अवस्था बिकट झाली होती. एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत आणि निकोलस पूरन यांसारखे दिग्गज स्वस्तात परतले. १५.६ षटकांत १२८ धावांवर ७ गडी बाद झाल्याने केकेआरचे चाहते जल्लोष करू लागले होते. मात्र, मुकुल चौधरीने आयुष बडोनीच्या (५४) साथीने प्रतिहल्ला चढवला. मुकुलने केवळ ९ फटक्यांमध्ये (२ चौकार, ७ षटकार) सामन्याचे चित्र पालटले आणि शेवटच्या षटकात लखनौच्या सलग दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
कोण आहे हा नवा सुपरस्टार मुकुल चौधरी?
२१ वर्षीय मुकुल चौधरी हा राजस्थानचा रहिवासी असून तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. ३० लाखांच्या बेस प्राईसवर असलेल्या मुकुलला लखनौने २.६० कोटी रुपये खर्च करून संघात घेतले होते. तो यष्टीरक्षक-फलंदाज असण्यासोबतच वेगवान गोलंदाजीही करू शकतो. आजच्या सामन्याने त्याने आपली मोठी किंमत सार्थ ठरवली आहे.





