बंगळुरु – अपघातग्रस्त रिषभ पंत विना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचे ग्रहण काही संपताना दिसत नाही. येथील एम.चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या आयपीएलच्या विसाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने(आरसीबी) विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर दिल्लीचा 23 धावांनी पराभव केला. यासह खराब कामगिरी करत असलेल्या दिल्लीचा हा या हंगामातील पाचवा पराभव ठरला.
दिल्लीला आरसीबीचे 175 धावांचे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 20 षटकांत 9 बाद 151 धावांवर संपला. दुसरीकडे, आरसीबीचा हा या मोसमातील दुसरा विजय ठरला. त्यामुळे गुणतालिकेत आरसीबी आता 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आरसीबीकडून विराटसह गोलंदाजीत विजयकुमार वशाखने 3 विकेट्स घेतल्या. दिल्लीने आरसीबीला 174 धावात रोखले खरे मात्र त्यांना या धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात करता आली नाही.
त्यांचे 4 फलंदाज पॉवर प्लेमध्ये 30 धावांत माघारी परतले. यानंतर मनिष पांडेने झुंजार अर्धशतकी खेळी केली. त्याला अक्षर पटेल 21 आणि अमन खानने 18 धावा करत थोडाफार साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र विजयकुमार व महंमद सिराजच्या(2 बळी) भेदक माऱ्यासमोर दिल्लीचे अन्य फलंदाज टिकू शकले नाहीत. दुसरीकडे दिल्लीकडून मिचेल मार्श आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
दिनेश कार्तिकचा लाजिरवाणा विक्रम
आयपीएल 2023 मध्ये अलिकडच्या काळात फिनिशर म्हणून ओळख मिळविलेल्या दिनेश कार्तिक अद्यापही सूर गवसल्याचे दिसत नाही. त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 1, केकेआरविरुद्ध 9 आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शून्य धावा केल्या आहेत. त्यातच आजच्या सामन्यातही त्याला आपले खातेही उघडता आले नाही. त्यामुळे कार्तिकच्या नावावर एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. आता तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 15 वेळा शून्यावर बाद होत मनदीप सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
विक्रमी विराट
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने शनिवारी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अर्धशतक करून आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. कोणत्याही एका मैदानावर 2500 धावा पूर्ण करणारा विराट आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. यासह एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. 2016 मध्ये त्याने 973 धावा करताना हा विक्रम केला होता.