नाशिक – अटकेत असलेले महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी संबंधित व्यवहाराची चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशिकमध्ये धडक मारल्याचे समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथे काही भंगार व्यावसायिकांची ईडीने कसून चौकशी केली.
नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी ईडीकडून सुरू होती. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची चौकशी झाली आहे. या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे समजते.
या प्रकरणात ईडीने दोन बिल्डरांनाही समन्स पाठवले आहेत. याप्रकरणातच मलिक यांना अटक करण्यात आली. मलिक यांचा स्वतःचा भंगारचा व्यवसाय आहे. नाशिकमध्ये या व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांची ईडीने चौकशी केल्याचे समजते.
नाशिकमधील अंबड परिसरात भंगार व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या ठिकाणी ईडीने अचानक धडक देत अनेक व्यापाऱ्यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली. या व्यापाऱ्यातील अनेकांचा थेट नवाब मलिक यांच्याशी संबंध होता. त्यांच्याशी यांचे व्यवहार सुरू असायचे. त्यामुळे ईडीने येथे येऊन झाडाझडती घेतल्याचे समजते.
याप्रकरणी अजूनपर्यंत तरी कोणाला ताब्यात किंवा अटक केल्याचे वृत्त नाही. या विषयावर प्रशासनामधील कोणीही माहिती द्यायला तयार नाही. शिवाय पोलिसांनाही याची खबर नाही. त्यामुळे या चौकशीचे गूढ वाढले आहे.