पुणे – समाजात कितीही बदल झाले; जगातील आर्थिक स्थिती कशीही असली, तरीही सुवर्ण अलंकाराची “क्रेझ’ अजूनही तितकीच कायम आहे. सोन्याला अनेक पर्याय निर्माण झाले असले, तरीही “गोल्ड इज गोल्ड’ म्हणत पुणेकरांनी शनिवारी (दि.22) अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर सुवर्ण खरेदीचा आनंद लुटला.
अक्षय्य तृतीयेला सोने-अलंकार खरेदीची परंपरा आहे. या दिवशी खरेदी केल्यास भरभराट होते, असा समज आहे. त्यामुळे नागरिकांकडून थोडे का होईना, आवर्जून सोन्याची खरेदी केली जाते. 1 ग्रॅम वेढणीपासून खरेदी करण्यात येते. परंपरेनुसार शनिवारी सकाळपासूनच नागरिकांनी शहरातील विविध सराफी पेढींवर सुवर्ण खरेदीसाठी गर्दी केली होती. 24 कॅरेट सोन्याला 60 हजार 300 ते 500 रुपये, 22 कॅरेटला 56 हजार 400 ते 600 रुपये भाव मिळत आहे. सोन्याच्या भावात तोळ्यामागे दीड हजार रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे खरेदीला उत्साह द्विगुणित झाला.
अक्षय्य तृतीयेची सुरुवात जोरदार झाली. सकाळपासून राज्यभरात आमच्या दालनात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. सोने आणि दागिने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला.
डॉ. सौरभ गाडगीळ, पीएनजी ज्वेलर्स अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे मंगळसूत्रासह अन्य दागिन्यांना जास्त मागणी आहे. इतर दागिन्यांचीही खरेदी करण्यात येत आहे. दोन दिवसांत सोन्याच्या भावात तोळ्यामागे सुमारे दीड हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खरेदीसाठी मोठा उत्साह आहे.
– रोहित शहा, ज्योतिचंद भाईचंद सराफ
महागाईच्या काळातही सोन्याला चांगली मागणी आहे. खरेदीवर भाववाढीचा फारसा परिणाम झालेला नाही. अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर वेढणी खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. लग्नसराई सुरू आहे. लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करण्यात येत आहे. – नितीन अष्टेकर, अष्टेकर ज्वेलर्स
ग्राहकांचा सोने खरेदीसाठी उत्साह चांगला आहे. तोळ्याचा भाव साठ हजारांपेक्षा जास्त असतानाही सोन्याला चांगली मागणी आहे. शुभ मुहुर्तावर खरेदी केल्याचा आनंद मिळतो, त्यामुळे आवर्जून खरेदी करण्यात येत आहे. हिरे आणि पारंपारिक इतर दागिन्यांच्या तुलनेत जास्त मागणी आहे.
– सुरिंदरपाल सिंग बीर, निलकंठ ज्वेलर्स