पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कंबोडियासह आशियातील अनेक देशांच्या संस्कृतीचे मूळ भारतीय संस्कृतीमध्ये आहे. भारतीय संस्कृतीचे वैभव आपल्याला आग्नेय आशियातील वास्तुशिल्पांमध्ये बघायला मिळते. तेथील लोक आजही भारतीय संस्कृतीचे पूजन मनोभावे करतात; परंतु आपल्या देशात आपल्या संस्कृतीबद्दल मात्र उदासीनता दिसून येते, अशी खंत मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केली.
ऋता उंबरजे आणि संगीता चाफेकर लिखित कंबुजा : एन्शियंट कंबोडिया पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते झाले. भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद जामखेडकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अंबरीश खरे या वेळी उपस्थित होते.
आपल्या देशाच्या महान संस्कृतीबद्दल इतर देशातील तज्ज्ञ बारकाईने अभ्यास करताना दिसतात. आपल्याला मात्र आपल्या देशातील संस्कृतीबद्दल केवळ माहिती असते. ही वैभवशाली परंपरा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी अशा पुस्तकांची गरज आहे, असे डॉ. देगलूरकर यांनी नमूद केले.
कंबोडिया देशाचे मूळ हे भारतीय संस्कृतीमध्ये आहे. त्या देशातील अनेक मंदिरांमध्ये भारतीय शिल्प आढळतात; परंतु भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जाणाऱ्या भारतीयांची संख्या मात्र आजही कमी आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीबद्दल आकर्षण निर्माण होऊन त्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी, तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या वाढेल, असे मत खरे यांनी व्यक्त केले.
आपणच आपल्या संस्कृतीचा सखोल अभ्यास करत नाही. आपल्या संस्कृतीचे वैभव आपल्याला परदेशामध्ये गेल्यानंतर कळते आपण विशेषतः तरुण परदेशामध्ये केवळ पर्यटनासाठी जातात. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी अशा पुस्तकाचा उपयोग होईल, असे जामखेडकर यांनी सांगितले. मंजिरी शहाणे यांनी सूत्रसंचालन केले.