इस्लामाबाद – भारताकडून अफगाणिस्तानला दिल्या जाणाऱ्या गव्हाची वाहतूक पाकिस्तानमार्गे करण्यास पाकिस्तान अनुमती देण्याची शक्यता आहे. या गव्हाच्या वाहतुकीला परवानगी देण्यात यावी, यासाठी तालिबानकडून करण्यात आलेल्या विनंतीवर सकारात्मक विचार केला जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
भारताकडून मानवतावादी भूमिकेतून केली जात असलेली मदत अपवाद समजून ही अनुमती देण्याबाबत विचार केला जाईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानचे प्रभारी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तगी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली.
अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी गहू दान करण्याबाबत भारताशी चर्चा सुरू असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड फूड प्रोग्रॅमच्या अफगाणिस्तानमधील संचालिका मेरी एलिन मॅक्ग्रोटी यांनी ऑक्टोबर महिन्यात म्हटले होते. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर भारताकडून अफगाणिस्तानला मानवतावादी भूमिकेतून मदत केली जाईल, अशी आशा तालिबानी नेत्यांनीही व्यक्त केली होती.