Mohsin Khan Records : मोहसिन खानचा मोठा पराक्रम! जयदेव उनाडकटचा मोडला १३ वर्षांपूर्वीचा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
Mohsin Khan Record : दुखापतीतून सावरून मैदानात परतलेल्या मोहसिन खानने इकाना स्टेडियमवर आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.

Mohsin Khan 5 wickets records vs KKR IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ३८ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खानने मोठा पराक्रम केला आहे. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. मोहसिनने या सामन्यात ५ विकेट्स घेत अनेक ऐतिहासिक विक्रमांना गवसणी घातली असून, यंदाच्या हंगामात पाच विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
मोहसिन खानचा मोठा पराक्रम –
दुखापतीतून सावरून मैदानात परतलेल्या मोहसिन खानने इकाना स्टेडियमवर आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मोहसिनने ४ षटकांत केवळ २३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या भेदक स्पेलमध्ये त्याने एक षटक निर्धाव (Maiden) देखील टाकले. मोहसिनच्या या कामगिरीमुळे लखनौने कोलकात्यावर वर्चस्व गाजवले.
१३ वर्षांनंतर मोडला उनाडकटचा रेकॉर्ड –
🔥 MOHSIN KHAN BREATHES FIRE!
First five-wicket haul of IPL 2026 and what a spell — 5/23 vs KKR 💥🎯💙 First Fifer of IPL 2026
⚡ 5 Wickets for 23 Runs
🏏 Match-winning impact for Lucknow Super Giants#MohsinKhan #LSG #IPL2026 #KKRvLSG #FirstFifer #Cricket #LucknowSuperGiants… pic.twitter.com/EiWiXICyaE— Realm Of Cricket (@RealmOfCricket) April 26, 2026
मोहसिन खान आता आयपीएल इतिहासात सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने जयदेव उनाडकटचा २०१३ मधील विक्रम (२५ धावांत ५ विकेट्स) मोडला. तब्बल १३ वर्षांनंतर कोणत्याही भारतीय डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला इतकी प्रभावी कामगिरी करता आली आहे. मोहसिनने टिम सिफर्टपासून सुरुवात करून अजिंक्य रहाणे, रोव्हमन पॉवेल आणि शेवटच्या दोन चेंडूंवर कॅमेरून ग्रीन व अनुकूल रॉय यांना बाद करत आपला ‘फाइव्ह विकेट हॉल’ पूर्ण केला.
अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत मानाचे स्थान –
या कामगिरीसह मोहसिनने आयपीएलमधील ‘अनकॅप्ड’ (भारतीय संघात न खेळलेले) गोलंदाजांच्या खास यादीत चौथे स्थान पटकावले आहे. या यादीत आकाश मधवाल (५/५) अजूनही अव्वल स्थानी आहे. मोहसिनने २०२२ मध्ये पदार्पण केल्यानंतर अनेक चढ-उतार पाहिले. २०२५ चा हंगाम दुखापतीमुळे गमावल्यानंतर त्याने २०२६ मध्ये दमदार पुनरागमन केले असून, ४ सामन्यांत आतापर्यंत ९ विकेट्स घेतले आहेत. मोहसिनच्या या ‘मॅजिकल’ स्पेलमुळे भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





