Shardul Thakur : लॉर्ड शार्दुल ठाकूर बनला बापमाणूस! नवीन वर्षापूर्वी चाहत्यांना दिली गोड बातमी!

Shardul Thakur Baby Boy : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूर याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी शार्दुलच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. शार्दुलची पत्नी मिताली पारुळकर हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, शार्दुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
गुप्त ठेवलेले ‘सरप्राईज’ अखेर समोर –
विशेष म्हणजे, शार्दुल आणि मितालीने मितालीच्या गरोदरपणाची बातमी शेवटपर्यंत गुप्त ठेवली होती. यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर याबाबत कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. मुलाच्या जन्मानंतर इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहित शार्दुलने म्हटले की, “आई-वडिलांच्या हृदयात दडलेले, शांतता आणि अथांग प्रेमाने जपलेले आमचे छोटेसे गुपित अखेर सर्वांसमोर आले आहे. स्वागत आहे प्रिय बाळा! हे ते स्वप्न होते जे आम्ही नऊ महिने शांतपणे मनात जपले होते.”
View this post on Instagram
शालेय जीवनापासूनची मैत्री आणि लग्न
३४ वर्षीय शार्दुल ठाकूर आणि मिताली पारुळकर हे शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत होते. प्रदीर्घ काळ एकमेकांना डेट केल्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता, ज्याला रोहित शर्मासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२३ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले.
काय करते मिताली पारुळकर?
मिताली पारुळकर ही केवळ क्रिकेटपटूची पत्नी नसून एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने कंपनी सेक्रेटरी म्हणून करिअरला सुरुवात केली होती. मात्र, बेकिंगमधील आवड ओळखून तिने ठाण्यात ‘ऑल जॅझ बेकरी’ (All Jazz Bakehouse) सुरू केली. आज ही बेकरी शहरातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक मानली जाते.
हेही वाचा – IND W vs SL W : भारताचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय; जेमिमाचे वादळी अर्धशतक, स्मृतीने रचला इतिहास!
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार –
शार्दुल ठाकूरने २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने १३ कसोटी, ४७ वनडे आणि २५ टी-२० सामने खेळले असून त्याच्या नावावर १३१ विकेट्स आणि ७७५ धावा आहेत. आगामी आयपीएल २०२६ मध्ये शार्दुल आपल्या घरच्या संघात म्हणजेच मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून ट्रेडद्वारे त्याला मुंबईच्या संघात सामील करून घेण्यात आले आहे.





