Rohit Sharma : “मला सगळं संपलं वाटलं, निवृत्ती घेणार होतो पण…”, हिटमॅन ‘त्या’ पराभवानंतर घेणार होता मोठा निर्णय

Rohit Sharma Revealed : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवाने कोट्यवधी भारतीयांसह रोहित शर्माचेही स्वप्नभंग झाले होते. या पराभवानंतरच्या आपल्या मनस्थितीवर रोहितने नुकतेच भाष्य केले असून, त्या काळातील आपला संघर्ष त्याने जगासमोर मांडला आहे.
मैदानावरच नव्हे, मनातूनही खचलो होतो
एका कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला की, २०२३ च्या विश्वचषक पराभवानंतर तो इतका निराश झाला होता की त्याने निवृत्तीचा विचार केला होता. “अहमदाबादमधील त्या अंतिम सामन्यानंतर माझा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. मी २०२२ मध्ये कर्णधारपद स्वीकारल्यापासून केवळ विश्वचषक जिंकण्याचे ध्येय ठेवले होते. त्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. पण निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याने मी पूर्णपणे खचून गेलो होतो. माझ्या अंगात कसलेच त्राण उरले नव्हते आणि या खेळानं माझ्यातली सगळी ऊर्जा काढून घेतल्यासारखं मला वाटत होतं,” असे रोहितने भावूक होऊन सांगितले.
👉रोहित शर्मा को ‘Masters’ Union द्वारा मिली डिग्री !
👉 रोहित शर्मा को मास्टर्स यूनियन में क्रिकेट के लिए उनके योगदान के सम्मान में मानद डिग्री और एक क्रिकेट बैट दिया गया !#RohitSharma | Rohit Sharma Degree #ncrpatrika #CricketNews #viralvideo #bcci pic.twitter.com/9bBKRGgCsH
— NCR पत्रिका (@ncrpatrika) December 22, 2025
दोन महिने लागले सावरण्यासाठी –
“At one point I was thinking I don’t want to play this sport anymore because it has taken everything from my body and don’t have anything left.”
Rohit Sharma on India World Cup 2023 loss🙂#RohitSharma #Cricket pic.twitter.com/cBd8Fe6sbp
— CREX (@Crex_live) December 21, 2025
रोहित शर्माने कबूल केले की, या धक्क्यातून सावरण्यासाठी त्याला दोन महिन्यांचा कालावधी लागला. “एका क्षणी मला वाटलं की आता मला क्रिकेट खेळायचंच नाही. पण आयुष्य तिथे संपत नाही, हे मला हळूहळू उमजलं. मी स्वतःला वारंवार आठवण करून दिली की, मला या खेळावर मनापासून प्रेम आहे. निराशेला कसं सामोरं जायचं आणि पुन्हा शून्यातून सुरुवात कशी करायची, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा होता,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा – IND W vs SL W : भारताचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय; जेमिमाचे वादळी अर्धशतक, स्मृतीने रचला इतिहास!
२०२४ च्या विश्वचषकाने दिली नवी उमेद –
अंतिम सामन्यात रोहितने १० सामन्यांतील विजयाची मालिका कायम राखत वैयक्तिक ५९७ धावा केल्या होत्या. मात्र, ट्रॅव्हिस हेडच्या शतकाने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले. या पराभवानंतर रोहितने आपले लक्ष २०२४ च्या टी-२० विश्वचषकावर केंद्रित केले. “त्या कठीण काळात स्वतःशी प्रामाणिक राहून मी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आज हे बोलणं सोपं असलं तरी, त्या क्षणी स्वतःला उभं करणं खरंच खूप अवघड होतं,” असेही रोहितने नमूद केले.
रोहितच्या या प्रांजळ कबुलीमुळे चाहत्यांना त्यांच्या लाडक्या ‘हिटमॅन’च्या मानसिक संघर्षाची जाणीव झाली असून, त्याने ज्या पद्धतीने पुनरागमन केले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.





