Sanjog Waghere : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर मोठ्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महायुती भक्कम करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते सामील करून घेतले जात आहेत. ही निवडणूक आणखी सोपी करण्यासाठी राजकीय गणित आखणी करून बेरीजचे राजकारण करण्याचा मानस महायुतीचा आहे. पण महायुतीमध्ये मोठा भाऊ म्हणून पाहिले जाणाऱ्या भाजपमध्ये जाण्याचा कल सर्वाधिक आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डायमेज कंट्रोल रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मोठ्या प्रमाणावर उद्धवसेनेतून आऊटगोईंग सुरूच आहे. अनेकांनी ठाकरेंची मशाल सोडली असून कमळ हाती घेतले आहे. आता या यादीमध्ये उद्धव सेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविणारे संजोग वाघेरे यांचा समावेश झाला आहे. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभेची निवडणूक ठाकरे सेनेकडून लढवली होती. वाघेरे यांना सहा लाख मतं मिळाली होती. मात्र शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. आज सकाळीच ते मुंबईकडे भाजपमध्ये पक्ष प्रवेशासाठी रवाना झाले असून, त्यांच्यासोबत अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील पक्ष प्रवेश करणार असल्याचा दावा वाघेरे यांनी केला आहे. काय सांगितले कारण? तसेच भाजपात जाण्याचा निर्णय का घेतला याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. येत्या काळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये वाढती लोकसंख्या आणि जे काही विकास आहेत त्याला चालना देण्यासाठी भाजपसोबत जात असल्याची प्रतिक्रिया संजोग वाघेरे यांनी दिली आहे. माझ्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, तेही आजच्या प्रवेशामध्ये आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. महानगरपालिकेसाठी माझी पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली होती, याबद्दल वाघेरे यांनी त्यांचे आभार मानले. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर पिंपरी चिंचवडमधील स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. हेही वाचा : अमेरिकेकडून सीरियावर मोठा हवाई हल्ला; ट्रम्प यांचा दहशतवाद्यांना कडक इशारा