“साठ वर्षांच्या इतिहासात शिवसेना कधी…”; राऊतांचा शिंदेंवर बोचरा वार, भाजपलाही चांगलचं सुनावलं

Sanjay Raut : मुंबई महापालिकाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेली आहे. यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि शिवसेनेची मुंबईत युती झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र येत निवडणूक लढवणार आहेत. तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप १३७ जागांवर निवडणूक लढणार आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला ९० जागा आल्या आहेत.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच उबाठाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तसेच भाजपला देखील त्यांनी कडक शब्दांत सुनावले आहे.
शिवसेना म्हणून मिरवणारे हे लोक भारतीय जनता पक्षाने फेकलेल्या जागांवर लढत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. भाजपा हा मराठी माणसाचा पक्ष नाही. भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा काडीमात्र संबंध नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले आहे.
शिंदेंवर टीका
स्वतःला अमित शाहांची शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभे राहावे लागत आहे. त्यांना फेकलेल्या जागांवर निवडणूक लढवावी लागत आहे. ही त्यांची शिवसेना आहे. यापूर्वी मुंबईत साठ वर्षांच्या इतिहासात शिवसेना कधी कुणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही. पण एकनाथ शिंदे यांचा गट युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शाहांच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षांनी त्यांना जागा दिलेल्या आहेत, अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
संजय राऊत यांचा दावा
जेव्हा दिलेला शब्द भाजपने पाळला नाही आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो आणि आम्ही आमचे राजकारण केले. आम्ही दिल्लीला शाह आणि मोदींच्या दारात जाऊन बसलो नाही, असा खोचक टोला त्यांनी एकनाथ शिंदेंचे नाव न घेता लगावला. आम्ही ताकदीने लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवला. आता त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणवून घेणे बंद केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेनाच खरी आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.





