Sanjay Raut health : संजय राऊतांच्या प्रकृतीची नरेंद्र मोदींना काळजी, ट्विट करून दिला मोठा आधार

मुंबई : शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार ‘संजय राऊत’ यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेत आहे. दरम्यान, राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
संजय राऊत यांनी काहीवेळापूर्वीच आपल्या ट्विटर हँडलवर एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे राऊतांच्या या ट्विटनंतर अनेकांकडून त्यांनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना केली जात आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्यासाठी ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटने राजकारण बाजूला सारून माणुसकी आणि राजकीय संस्कृतीचं दर्शन घडल्याचं बघायला मिळत आहे.
“संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे.
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती : संजय राऊत
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.! असं संजय राऊत आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.





