Indapur ZP Election: आचारसंहिता येण्याआधीच राजकीय ड्रामा; जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार, याकडे इच्छुक उमेदवारांचे डोळे लागले असून तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. जिल्हा परिषदेचे गट बदलले. मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यामुळेच राजकीय समीकरणे नव्याने मांडली जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.मागील कार्यकाळात इंदापूर तालुक्यात ७ जिल्हा परिषद सदस्य व १४ पंचायत समिती सदस्य असे चित्र होते.
मात्र, नव्या पुर्नरचनेनुसार आता तालुक्यात ८ जिल्हा परिषदेचे गट निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये भिगवण- शेटफळगडे, पळसदेव- बिजवडी, माळवाडी- वडापुरी, निमगाव केतकी- शेळगाव, बोरी- वालचंदनगर, लासुर्णे- सणसर, काटी- लाखेवाडी आणि बावडा- लुमेवाडी या नव्या गटांचा समावेश आहे. या बदलामुळे इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली असून प्रत्येक गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन्ही स्तरांवर इच्छुकांची मोठी गर्दी उसळली आहे. जवळपास प्रत्येक गावातून इच्छुक पुढे आले असून सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस हे इच्छुकांचे प्रमुख केंद्र बनल्याचे चित्र आहे.दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रवीण माने,
माजी आमदार यशवंतराव माने व प्रदीप गारटकर यांनी एकत्र येत कृष्णा भीमा विकास आघाडी उभी केली होती. या आघाडीने नगरपालिकेच्या रिंगणात उतरून सत्ताधाऱ्यांना जोरदार आव्हान दिले. राजकीय ताकद दाखवून दिली. हाच आत्मविश्वास घेऊन कृष्णा- भीमा विकास आघाडी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीही दंड थोपटून पुढे येताना दिसत आहे. त्यामुळे झेडपी निवडणुकीत चुरस होणार आहे.
इच्छुकांना दोन पर्याय
विशेष म्हणजे या आघाडीतही इच्छुकांची संख्या इतकी वाढली आहे की, उमेदवारी कुणाच्या पदरात पडणार, याचा अंदाज सध्या तरी बांधता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने डावलल्यास कृष्णा भीमा विकास आघाडी हा पर्याय अनेकांना आकर्षक वाटत आहे; तर दुसरीकडे आघाडीला अपेक्षित यश मिळाल्याने राजकारणातील बुजुर्ग इच्छुकांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठाण मांडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग
दरम्यान, या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याआधी इच्छुकांची आपापल्या नेत्यांकडे जोरदार राजकीय पळापळ सुरू आहे. भेटीगाठी, बैठका, शक्तिप्रदर्शन आणि समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असले तरी इंदापूर तालुक्यातील ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष लढतीकडे लागणार, यात मात्र कोणतीही शंका नाही.





