जमिनीत यंदा कमी ओलावा
रमेश जाधव
रांजणी – मान्सूनचा पाऊस वेळेत व पुरेसा न पडल्यामुळे सर्वत्रच खरीप पिकाला फटका बसला. त्यात अपुरा पाणीसाठा आणि तीव्र ऑक्टरोबर हिटमुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच जमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. जलाशयांमधील कमी पाणीसाठ्यामुळे संरक्षित सिंचनाच्या समस्या वाढल्या आहेत. परिणामी तालुक्यातील रब्बी हंगाम संकटात येण्याची चिन्हे आहेत. सध्या तरी शेतकऱ्यांची आता अवकाही पावसावरच भिस्त आहे.
आंबेगाव तालुक्यात चालू वर्षी खरीप हंगामात पाऊस वेळेवर पडला नाही. त्यामुळे खरीप हंगाम लांबला. कोरडवाहू पेरणी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे येणारा रब्बी हंगाम जमिनीत कमी ओलावा असल्याने संकटात येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान यंदा अपेक्षित न पडलेला पाऊस जलसाठ्यांची दयनीय अवस्था, उपशावर असलेल्या विहिरी, बोअरवेल आणि ओलावा नसलेल्या जमिनी यामुळे तालुक्यातील यंदाच्या रब्बीची वाट अवघडच आहे. एखादा अवकाळी पाऊस जर झाला नाही तर रब्बी पिकाच्या पेरणी सोबतच फळबागांवर संकटाची कुऱ्हाड पुन्हा एकदा कोसळणार आहे.
मुळातच चालू वर्षी कमी प्रमाणात पाऊस बरसला त्यामुळे भूपृष्ठावरील सिंचन स्रोत नाही. पुरेसे पाणी नाही दुसरीकडे वाढते तापमान जमिनीतील ओलावा नाहीसा करत आहे. तापमान आतापासूनच 35 अंशाच्या पुढे जात आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो आहे. परिणामी यंदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा क्षेत्र घटण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यात कमी पाण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारीचा पेरा करण्याशिवाय पर्याय नसून हे पीकदेखील कितपत हाती लागते याविषयी शंका आहे.
ऑक्टोबर हिटचा चटका वाढला
मान्सून परतल्यानंतर तालुक्याच्या बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान झाले आहे. हस्त नक्षत्राचा तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस बरसला; मात्र आता स्वाती नक्षत्रात पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या तरी ही परिस्थिती नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर हिटचा चटका वाढल्याने तालुक्यात उन्हाची ताप वाढली आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम आहे.
डिंभे भरले; पण नियोजन आवश्यक
तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणातील पाण्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. डिंभे धरणात पाणी उपलब्ध असल्यामुळे धरणातील पाणी शेतकऱ्यांना भविष्यकाळात वरदान ठरू शकते. तरीदेखील पाण्याचे निसयेजन तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.