सोशल मीडियाचा वापर करत तरुणीला फसवले
हिंगोली – (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली शहरात एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर निर्माण झालेल्या ओळखीतून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. शहरालगत असलेल्या बोळसोंड भागात फेसबुकद्वारे झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण करून तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका तरुणासह दोघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळाबाजार येथील एक तरुणी मागील काही वर्षापासून हिंगोली शहरालगत बळसोंड भागात राहण्यासाठी आली होती. यावेळी तरुणीची फेसबुकद्वारे जुनेद शमीउल्लाखाँ पठाण (रा.पेन्शनपुरा, हिंगोली) याच्या सोबत ओळख झाली. जुनेदने त्या तरूणीसोबत फेसबुकद्वारे चॅटींग करून तिच्या सोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याशी वारंवार संपर्क साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
जुनेद याने तरुणीला लग्नाचे आमिषही दाखवले. त्यानंतर तरुणीवर जुनेद याने मागील एक वर्षापासून अत्याचार केले. त्यानंतर मागील काही दिवसांपासून तो त्या तरुणीला मारहाणही करू लागला होता. तर जुनेद याचा भाऊ अजमत शमीउल्लाखाँ पठाण याने त्या तरुणीला ‘तु माझ्या भावा सोबत राहू नको, तु त्याला सोडून दे’, असे म्हणून तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने शनिवारी रात्री थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठले.
तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जुनेद पठाण व त्याचा भाऊ अजमत पठाण याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक मुपडे, जमादार अशोक धामणे, आकाश पंडीतकर, गजानन पोकळे यांच्या पथकाने रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.