नवी दिल्ली – रशियानं युक्रेनवर हल्ला केला तर मोठा नरसंहार होईल, अशी भीती अमेरिकेनं व्यक्त केली आहे. रशियाच्या सुमारे 1 लाख फौजा युक्रेन सीमेनजीक तैनात आहेत, शीत युद्धानंतरची ही सर्वाधिक संख्या आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे वरिष्ठ संरक्षण अधिकारी मार्क मिली यांनी म्हटलं आहे.
रशियानं युक्रेनवर हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असं अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉंईड ऑस्टिन यांनी म्हटलं आहे.ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन हे याप्रकरणी चर्चा करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना दूरध्वनी करणार आहेत.रशियानं युक्रेनवर हल्ला केला तर नाटो फौजांच्या संरक्षणासाठी ब्रिटन फौजा तैनात करेल, असं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, पाश्चात्य देशांनी रशियन आक्रमणाची संभाव्यता दाखवून निष्कारण भीतीचं वातावरण तयार करू नये, आधीच रसातळाला गेलेल्या युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर त्यामुळे आणखीच वाईट परिणाम होतील, असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.