ओस्लो- उघ्युरांची भाषा, संस्कृती आणि एकूणच त्यांची संपूर्ण ओळखच पुसून टाकण्याचे चीन सरकारचे लक्ष्य असल्याचा आरोप अमेरिकेतील रेडिओ फ्री एशियासाठी काम करणाऱ्या पत्रकार गुलशहरा होजा यांनी केला आहे.
मानवाधिकार संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना होजा म्हणाल्या की, जेव्हापासून त्यांनी रेडिओ फ्री एशिया अर्थात आरएफओसाठी काम करण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्या त्यांच्या घरी जाऊ शकलेल्या नाहीत. अगोदर त्या चीनच्या शिनजियांग टीव्हीसाठी काम करत होत्या. मात्र, चीनकडून उघ्युरांबद्दल जो अपप्रचार केला जातोय तो आपल्या लक्षात आल्यानंतर आपण ती नोकरी सोडली आणि अमेरिकेत आलो.
आपल्या प्रवासाबद्दल माहिती देताना होजा म्हणाल्या की, त्या 2001 मध्ये जेव्हा प्रथम युरोपात आल्या तेव्हा त्यांना उघ्युरांचा खरा इतिहास समजला. तोपर्यंत मी अज्ञानात होती. माझ्या कामावर प्रेम करत होती. मात्र त्याचे वास्तवाशी आणि पत्रकारितेशी काहीही नाते नव्हते. तो केवळ चीनकडून केला जाणारा एक अपप्रचार होतो. आरएफए ऐकल्यानंतर मला वास्तवाची जाणीव झाली.
इतके वर्ष मी माझ्या लोकांशी खोटे बोलत राहिले. त्यामुळे मला अपराध्यासारखे वाटत होते. चीन सरकारने माझ्याच लोकांविरुद्ध माझा केवळ वापर करून घेतला ही भावना वेदनादायी होती, असे नमूद करत त्या म्हणाल्या की, त्यानंतरच चीनमधून सुटका करण्याचा मी निर्णय घेतला. हा निर्णय खूप त्रासदायकही होता. कारण मी चीन सोडल्यानंतर माझ्या कुटुंबीयांची छळवणूक केली जाईल, असा इशारा मला काहींनी दिला होता. मात्र, मी ठाम होते कारण मी अजून खोटे बोलू शकत नव्हते.
चीनच्या विविध छावण्यांमध्ये जवळपास 1.8 दशलक्ष उघ्युरांना ठेवण्यात आले असल्याचा व त्यांची ओळखच मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होजा यांनी केला. आपण जेव्हा अमेरिकेत पहिल्यांदा कामाला सुरुवात केली तेव्हा आपली ओळखच नव्हती. स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर अशी ओळख नसलेल्या व्यक्तीचे काम मी करत होते. मात्र मनातून मी समाधानी होते कारण खोटा प्रचार करणाऱ्या चिनी व्यवस्थेतून मी बाहेर पडले होते, असेही त्यांनी सांगितले.