चीनने नेपाळचाही भूभाग बळकावला

काठमांडू- चीनकडून नेपाळचा भूभाग बळकावल्याच्या विरोधात नेपाळच्या स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असून देशात ठिकठिकाणी याच्या विरोधात निदर्शने करत नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. चीनने आमच्या हद्दीत अनेक बांधकामे करत निदर्शकांनी चीनविरोधात घोषणाबाजी केली असून चीनने मात्र ही बांधकामे आपल्याच हद्दीत केली असल्याचा दावा केला आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे नेपाळमध्ये एकप्रकारची खदखद असून आपल्याच सरकारच्या विरोधात नाराजी आहे. मात्र अजुनही सरकारकडून चीनने जमीन बळकावल्याच्या संदर्भात अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. चीनच्या विस्तारवादी भूमिकेपुढे नेपाळ सरकारने गुडघे टेकले असल्याचेच चित्र सध्या निर्माण झाले आहे.

नेपाळमधील सध्याचे के पी शर्मा ओली सरकार चीन समर्थक मानले जाते. ओली यांचा चीनकडे कल असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात नेपाळ आणि भारत संबंधांत काहीशी कटूताही आल्याचे गेल्या काही महिन्यांतील घटनांवरून सिध्द झाले आहे. मात्र ओली यांच्या याच मैत्रीचा गैरफायदा चीनकडून घेतला जात असून त्यांनी आता नेपाळची जमीनही बळकावण्यास सुरूवात केली आहे. चीनकडून नेपाळी भागावर राजरोस अतिक्रमण केले जात असले तरी नेपाळमधील त्यांच्या दुतावासाने अतिक्रमणाचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. नेपाळ-चीन सीमेवर जी बांधकामे करण्यात आली आहेत, ती आमच्याच हद्दीत असल्याचा चीनचा दावा आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये कोणताही सीमा वाद नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनीही चीनच्या सुरात सूर मिसळला असून कोणताही वाद नसल्याचे व आमच्या भूमीवर कोणतेही अतिक्रमण झाले नसल्याचे म्हटले आहे.

नेपाळ सरकारच्या याच भूमिकेमुळे नेपाळी जनतेत नाराजी असून चीनच्या विस्तारवादी भूमिकेचा निषेध करत त्यांनी बळकावलेली जमीन परत करावी अशी मागणी करत निदर्शने करण्यात येत आहेत. नेपाळच्या चीनलगतच्या सीमेवरील हुमला जिल्ह्यात चीनने अनेक इमारती बांधल्या असून त्या नेपाळच्या हद्दीत दोन किमी आतपर्यंतच्या अंतरावर बांधण्यात आल्या आहेत. ही आपली हद्द असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, तर हा आमचा भूभाग असल्याचा चीनच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे.

दरम्यान, हुमला जिल्हा प्रशासनाने याबाबत अहवाल तयार करून तो काठमांडूला पाठवला आहे. मात्र देशातले सरकार सध्या तरी चीनच्या सूरात सूर मिसळताना दिसते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.