हिंगोली – हिंगोलीमध्ये लक्झरी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात घडला. यामध्ये चार जणांचा मृत्यू, तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. हा अपघात हिंगोली ते नांदेड रोडवरील पार्डी मोड फाट्यावर बुधवारी झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हा भीषण अपघात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाल्याचे समजते. या अपघातातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच जखमींना उपचारासाठी कळमनुरी आखाडा बाळापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. क्रेन व जेसीबीच्या साह्याने ट्रकला हलविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे हिंगोली ते नांदेड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.