मानाच्या गणपतींची उत्साहात प्रतिष्ठापना
मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीच केली मुख्य पूजा
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने उत्सव
पुणे – शेकडो वर्षांची वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या पुणे शहरात दरवर्षी भाविकांची अफाट गर्दी.. दर्शनासाठी रांगा..भव्य रांगोळ्या..हजारो भाविकांच्या साक्षीने निघणाऱ्या मिरवणुका..नेत्रदीपक सजावट आणि आसमंत दणाणून टाकणारा ढोल-ताशांचा गजर अशा भारावलेल्या वातावरणात मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना होते. मात्र, यंदा करोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शनिवारी मंगलमय वातावरणात गणेशोत्सवाची सुरुवात झाली असून, मंडळाचे पदाधिकारी आणि मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाच्या पाच आणि प्रमुख तीन गणेशोत्सव मंडळांनी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करत नवा पायंडा घातला आहे.
प्रारंभी विनती करू गणपति विद्यादयासागरा। अज्ञानत्व हरूनि बुद्धि मति दे आराध्य मोरेश्वरा ।।
चिंता, क्लेश, दारिद्य्र अवघीं देशांतरा पाठवी। हेरंबा, गणनायका, गजमुखा भक्ता बहु तोषवी।।
श्री गुरुजी तालीम
मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना शनिवारी दुपारी 12.15 मिनिटांनी झाली. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि उद्योजिका जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्री कसबा गणपती
मानाचा पहिला आणि पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी करण्यात आली. लाल महालापासून परंपरेनुसार पालखीतून श्रींची मूर्ती उत्सवमंडपात दाखल झाली. स्थायी समितीचे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. यावेळी धार्मिक कार्यक्रम पार पडले.
श्री तांबडी जोगेश्वरी
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजता झाली. गणरायाची मूर्ती तांबडी जोगेश्वरी मंदिरातून उत्सवमंडपात आणण्यात आली. सनई-चौघड्यांच्या सुरात अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली.
श्री तुळशीबाग गणपती
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी झाली. परंपारिक पद्धतीने पूजा करण्यात आली. केसरीवाडा गणपती ट्रस्टचे डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्री केसरीवाडा गणपती
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजता डॉ. रोहित टिळक आणि डॉ. प्रणिती टिळक यांच्या हस्ते झाले. यावेळी मिरवणूक न काढता पालखीतून श्रींची मूर्ती केसरीवाड्यात आणण्यात आली. तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती झाली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11.10 मिनिटांनी कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते.
श्री शारदा गणेश विराजले…
अखिल मंडई मंडळाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. यावेळी मंदिराला फुलांची आरास करण्यात आली होती. मोजक्या कार्यकर्त्यांच्या श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.