मुंबई – तिमांशू धुलियाने 2003 मध्ये विद्यार्थी राजकारणावर आधारित ‘हासील’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. आता जवळपास दोन दशकांनंतर त्यांनी विद्यार्थी राजकारणावर आधारित ‘गरमी’ ही वेबसिरीज बनवली आहे.तिमांशू धुलिया आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. दिग्दर्शन असो वा अभिनय धुलिया आपली वेगळी छाप सोडतात.
ट्रेलरवरून ही एका कॉलेज तरुणाची कथा असल्याचे समजते. आजवर विद्यार्थी राजकारणावर अनेक चित्रपट तसेच वेब सिरीज देखील बनल्या परंतु युपीमध्ये चित्रित झालेल्या गरमी या सिरीजच्या ट्रेलरचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. भाषेत यूपीतील ठसका आणि शिव्यांचा भडीमार यामुळे कॉलेज तरुणांचा हा राडा प्रेक्षकांना चांगलाच आवडणार असल्याचे दिसते.
या सिरीजमधील नायक एका छोट्या गावातून शहरात शिकायला येतो. जो वयाच्या 22-23 व्या वर्षी स्टार कॉलेजचा बनताना दिसतो. ट्रेलरमध्ये बहुतांशी चेहरे नवीन वाटत असले तरी कॉलेज राजकारणाचा धुराळा काय असतो याचा प्रत्येय येण्यासाठी पुरेसे आहेत. कॉलेज वयातील तरुण राजकारणाकडे कसा वळतो.. राजकारणी मंडळी कॉलेजला राजकीय अड्डा कसा बनवतात? या तरुणाचं पुढील राजकारणातील भविष्य नेमकं कस होत? याबाबतच्या सर्व सस्पेन्सवरून लवकरच पडदा हटणार आहे.
सोनी लिव्हवर 21 एप्रिल पासून ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. तिमांशू धुलिया आणि कमल पांडे यांनी या सीरिजचे लेखन केले आहे. तर सिरीजचा बहुतांशी भाग प्रयागराज येथे चित्रित करण्यात आला आहे. योम यादव,दिशा ठाकूर पुनीत सिंह, पंकज सारस्वत यांच्या या सिरीजमध्ये महत्वाच्या भूमिका आहेत.