Hemant Godse car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही मात्र त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. यात हेमंत गोडसे यांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
हेमंत गोडसे दिल्लीत येत असताना बी डी मार्गावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. ते इनोव्हा MH 15 FC 9909 या गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका डीएल 7CW 2202 या गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये हेमंत गोडसे यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवानं या अपघातामध्ये त्यांच्यासह इतर सहकाऱ्यांना दुखापत झाली नाही. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेले नाही.
कोण आहेत हेमंत गोडसे ?
हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटातील नाशिकचे खासदार आहेत. हेमंत गोडसे यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून झाली. 2009 च्या निवडणुकीतही त्यांनी मनसेकडून खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014आणि 2019 साली खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत मोठा विजय मिळवला होता.