बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. मात्र एकीकडे ‘अॅनिमल’ चित्रपट सुपरहिट होत असतानाच मराठी चित्रपट झिम्मा 2 देखील यशस्वी कामगिरी करत आहे. यापूर्वी या चित्रपटाच्या पहिल्या भागाला देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. अशातच दिग्दर्शक हेमंत ढोमेने झिम्मा 2 संबंधी एक नवीन पोस्ट केली आहे. मात्र या पोस्टच्या माध्यमातून त्याने ‘अॅनिमल’ निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.
हेमंतने सोशल मीडियावर झिम्मा 2 मधील कलाकारांचा फोटो पोस्ट केला. हे फोटो पोस्ट करत हेमंतने लिहिले की, “सगळ्या हिंसक पुरूष पात्रांच्या काळात प्रेम करणारा कबीर… अखेरच्या श्वासापर्यंत आयुष्य सुंदर करणारी इंदू… आपणंच घालून घेतलेली बंधंनं हळूहळू सैल करणारी निर्मला… नव्या रूपात नवं बाईपण जपणारी मनाली…हरवून मग स्वतःला नव्याने सापडलेली मिता… मैत्रीसाठी कोणाशीही दोन हात करणारी वैशाली… Unapologetically honest जगणारी कृतिका… घर सांभाळणारी, आपल्या माणसांवर प्रेम करणारी तानिया… ही सगळी पात्र तुम्ही आपली केलीत… कोणाला कोणीतरी आपली ताई, आई, मावशी, आत्या, मैत्रीण वाटली… कोणालातरी वाटलं आपणंच आहोत!”
View this post on Instagram
हेमंत पुढे लिहीतो, “तुमच्यातलं आणि पडद्यामधलं अंतर पुसून टाकणारी ही पात्र माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंद देणारी आहेत…ही पात्र मेहनतीने, ताकदीने, कधी रूसत, कधी भांडत, कधी रडत, कधी हसत, कधी मस्ती करत… पण प्रेमानं मायेनं साकारणाऱ्या माझ्या या ८ कलाकारांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी ही पोस्ट! Love you all, तुम्ही माझी पात्र जिवंत करून Relatable केलीत!”
जवळपास दोन वर्षांपूर्वी ‘झिम्मा’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. त्यानंतर आता 2023 हे वर्ष ‘झिम्मा 2’मुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरलं आहे. महिलांचं भावविश्व मांडणाऱ्या या चित्रपटाच्या कथेने सर्वांचे मन जिंकले. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.