गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गोंदिया शहराच्या जवळून वाहणाऱ्या पांगोली नदीच्या पाणीपत्रात देखील वाढ झाली आहे.
या नदीवर बारब्रिक्स कंपनीच्या वतीने पुलाचे बांधकाम सुरु आहे. मात्र, हा पर्यायी पूल कमी उंचीचा असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या मार्गावरुन होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी दुसऱ्यांदा हा पूल बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
जिल्हातील पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने धरण साठ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला धरण रात्री भरले आहे. या धरणाचे आठ दरवाजे एक फूट उंचीने उघडण्यात आले आहेत. त्यातून 6021 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आलेला आहे.