नेवासा – वाळूच्या गाडीची माहिती तहसीलदार व पोलिसांना देतो, असा संशय व्यक्त करत एका वाळूतस्कराने शहरातील एका तरुणाच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रकार तालुक्यातील गोधेगाव-कायगाव रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान घडला. मात्र, सोबतच्या मित्राने प्रसंगावधान राखून फिर्यादीस बाजूला ओढल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी नेवासा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रशांत ऊर्फ दादा डाके (रा. नेवासा) असे जखमीचे नाव असून, डाके यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांत पप्पू ऊर्फ शंकर पटारे (रा. धामोरी, ता. नेवासा) याच्याविरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डाके याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील धामोरी येथील शंकर ऊर्फ पप्पू पटारे हा त्याच्या ओळखीचा असून, तो चोरून वाळू वाहतुकीचे काम करतो. त्याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
याबाबत दोन-तीन दिवसांपूर्वीही त्याने माहिती देतो म्हणून वाद घातला होता. दरम्यान, मंगळवारी (दि. 2) रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी व त्याचे मित्र बंटी वाघ, तुकाराम बाचकर, दीपक शेजूळ गोधेगाव येथील योगेश जाधव यांच्याकडे गेले होते. रात्री 9:30च्या सुमारास ते सर्वजण घरी नेवासा येथे येत असताना त्यांनी गोधेगाव-कायगाव रस्त्याकडेला लघुशंकेसाठी गाडी उभी करून थांबले असता तेथे त्यांच्या समोरून शंकर ऊर्फ पप्पू पटारे त्याच्या आय 20 गाडीमधून त्यांच्याजवळ आला.
त्यांना म्हणाला की, ‘मी तुमच्या एकाचा तरी काटा काढणार आहे’, असे म्हणून तो भरधाव गोधेगावकडे निघून गेला. हे लघुशंका करून काही वेळ त्या ठिकाणी थांबले असता त्याच वेळी एक पांढरे भगवे रंगाचे डंपर गोधेगावकडून कायगावकडे जाणाऱ्या रोडने भरधाव आला.ड्रायव्हरने जीवे मारण्याच्या उद्देशाने डंपर फिर्यादीच्या अंगावर घातला. परंतु त्याला मित्र बंटी वाघ याने बाजूला ओढल्याने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या घोट्यावरून गेले.
त्यानंतर डंपर पुढे काही अंतरावर जाऊन थांबला. त्यातून ड्रायव्हरच्या बाजूने पप्पू ऊर्फ शंकर पटारे खाली उतरला व दुसऱ्या बाजूने एक अनोळखी इसम खाली उतरला. पप्पू पटारे हा फिर्यादीजवळ आल्यावर आम्हाला म्हणाला की, तुम्ही यावेळी वाचले, पुन्हा जर माझ्या नादी लागले, तर तुम्हा एका एकाला डंपरखाली घेऊन जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली.
पोलिसांचा प्रताप!
गुन्हा दाखल झालेल्या फिर्यादी लवकर प्रसिद्धी माध्यमांकडे येऊ न देता वेळ मारून नेण्याचा प्रताप केला जात असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.