ओझर – जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे वयाच्या 74 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे रविवारी (दि. 11) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व शेकडो जनतेच्या उपस्थितीत शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरीची सलामी देत हजारो नागरिकांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देत श्रद्धांजलीतार्पण केली.
यावेळी आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, विलास लांडे, प्रदिप गारटकर, जुन्नर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने उपस्थीत होते. वल्लभ बेनके यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्यातील निष्ठावान सहकारी गमावला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तर जुन्नरच्या विकासात बेनके यांचा मोलाचा वाटा होता. आमदार अतुल बेनके, वल्लभ बेनके यांच्या पत्नी राजश्री बेनके, डॉ. अमोल बेनके, अमित बेनके व परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. वल्लभ बेनके यांच्या निधनामुळे जवळचा सवंगडी गमावल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
वल्लभ बेनके यांची कारकिर्द
वल्लभ बेनके हे शरद पवार यांच्या एस काँग्रेस पक्षाकडू 1985 मध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडू गेले होते. पुढे सलग 10 वर्षे त्यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले, पुन्हा दोन पंचवार्षिकमध्ये त्यांना अपयश आले व पुन्हा दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जुन्नरचे आमदार म्हणून ते निवडून गेल्याने शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण झाली होती. कुकडी प्रकल्पाच्या माध्यमातून जुन्नर तालुका पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी व परिसराचा विकास करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केला.