चेन्नाई – एका मजुराचा खून केल्याच्या कारणावरून द्रमुक पक्षाचे खासदार टीआरव्ही एस रमेश यांना आज अटक करण्यात आली. हा खून करून ते फरारी झाले होते. पण नंतर ते सकाळी कुड्डलुर जिल्ह्यातील कोर्टापुढे शरण आले. या खासदाराचे काजू प्रकिया युनिट आहे.
त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुराची या खासदाराकडून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात होता. गेल्या महिन्यात हा प्रकार घडला आहे. या मजुराने आठ किलो काजू चोरल्याचा आरोप होता. त्याला तेथील अन्य कामगारांनी व स्वतः खासदारांनी बेदम मारहाण केली. त्यात तो मरण पावल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाचा तपास सीबी-सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, आपल्यावरील हा आरोप खोटा असून आपल्या पक्षाच्या सरकारला आपल्या आडून बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू असल्याने मी स्वतःहून कोर्टापुढे हजर झालो आहे, असे खासदार रमेश यांनी म्हटले आहे.