नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या पक्षांतरामुळे कॉंग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच कॉंग्रेसला रामराम केल्यानंतर आता झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी आणि सिंहभूम येथील खासदार गीता कोडाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेस पक्षाने राज्यात जी आघाडी केली त्यावर गीता कोडा नाराज होत्या असे सूत्रांचे म्हणणे आहे.
गीता यांचे पती मधु कोडा हे झारखंडचे मुख्यमंत्री होते. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडचणीत आल्यामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. गीता स्वत: अगोदर जय भारत समानता पार्टीशी संबंधित होत्या. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसची साथ दिली होती. खासदार होण्याच्या अगोदर गीता जगननाथपूर येथून आमदारही राहील्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे प्रभावित होऊन आपण या पक्षात आलो आहोत व भाजप प्रवेशासाठी आपण कोणती अट ठेवली नव्हती असे कोडा यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालत नसल्याचा आरोप करतानाच मोदीच झारखंडचा विकास करू शकतात असा दावाही त्यांनी केला. कॉंग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याबाबत बोलते. मात्र हा पक्ष केवळ एका कुटुंबालाच सोबत घेऊन जातो आहे.
जेथे सगळ्यांचे हित आहे तेथेच राहीलेले बरे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले. कॉंग्रेसच्या झारखंडमधील एकमेव खासदार असलेल्या गीता म्हणाल्या की त्या पक्षात त्यांचा जीव गुदमरत होता.
दरम्यान, कोडा यांना भाजपचे नेते बाबुलाल मरांडी प्राथमिक सदस्यत्व दिले. यावेळी मधु कोडाही उपस्थित होते. कोडा दाम्पत्य हो या समुदायातून येतात आणि अनेक विधानसभा मतदारसंघांत या समुदायाचा प्रभाव आहे. मधु कोडा अगोदर भाजपशीच संबंधित होते. २००० मध्ये ते भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यावेळी मरांडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीही करण्यात आले होते. मात्र २००५ मध्ये त्यांचे तिकिट कापल्यानंतर ते अपक्ष म्हणून विजयी झाले होते व विशेष म्हणजे त्याचवेळी ते राज्याचे मुख्यमंत्रीही झाले होते.