संगमनेर – लोकाभिमुख बनवणारे निळवंडे धरणाचे शिल्पकार, जलनायक कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यसैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
मनमाड येथे कॉ. गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 2023 चा राजकीय सामाजिक सहकार व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दलचा हा पुरस्कार आ. थोरात यांना जाहीर करण्यात आला यावेळी अध्यक्ष ऍड. साधना गायकवाड, सचिव कॉ.राजू देसले, विश्वस्त भास्कर शिंदे, दामू पाटील उपस्थित होते. 51 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, शाल, गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कॉ. गायकवाड यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार आमदार थोरात यांना जाहीर झाला आहे.
आ. थोरात हे 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधित्व करत आहे. राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, रोहयो, राजशिष्टाचार, खार जमीन, जलसंधारण, पाटबंधारे अशी विविध पदे त्यांनी सांभाळली असून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही यशस्वीपणे सांभाळले आहे. कॉंग्रेसच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे ते सदस्य असून सध्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाला त्यांनी पाणी दिले आहे.