Robert DuBoise | एखाद्या व्यक्तीला चुकीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आल्याचे आपण ऐकतो. मात्र, कधी कधी असंही ऐकायला मिळतं की, एखादी व्यक्ती आयुष्याचा मोठा भाग तुरुंगात घालवते आणि नंतर म्हातारपणात तो निर्दोष ठरतो. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. इथे एका व्यक्तीला त्याच्या तरुणपणाची 37 वर्षे त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी घालवावी लागली. रॉबर्ट ड्युबॉईस असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
रॉबर्ट ड्युबॉईस ( Robert DuBoise ) जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा ते 18 वर्षांचे होते. 2020 मध्ये 37 वर्षांनी ते तुरुंगातून बाहेर आले. त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग तुरुंगात अनावश्यकपणे व्यतीत झाला. आता त्यांला 14 दशलक्ष डॉलर (116 कोटी रुपये) नुकसानभरपाई म्हणून मिळणार आहेत. रॉबर्ट सध्या 59 वर्षांचे आहेत.
यापूर्वी फाशीची शिक्षा दिली होती –
फ्लोरिडाच्या रॉबर्टने लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या चुकीच्या आरोपाखाली 37 वर्षे तुरुंगात घालवली. हा गुन्हा घडला तेव्हा रॉबर्ट 18 वर्षांचा होता. रॉबर्टला 19 वर्षीय बार्बरा ग्राम्सच्या (Barbara Grams) हत्येसाठी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. नंतर त्यांची शिक्षा जन्मठेपेत कमी करण्यात आली. यानंतर, 2018 मध्ये, इनोसेन्स प्रोजेक्ट ऑर्गनायझेशनच्या मदतीने, फिर्यादींनी केस पुन्हा उघडण्यास सहमती दर्शविली. डीएनए चाचणीत या प्रकरणात आणखी दोघांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. आणि राॅबर्ट निर्दोष असल्याचे समोर आले. यानंतर रॉबर्टला 2020 मध्ये सोडण्यात आले.
राॅबर्ट कारागृहातून बाहेर येताच तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा –
रॉबर्ट तुरुंगातून बाहेर येताच, त्यांनी टेम्पा शहर तपास पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक दंतवैद्य यांच्यावर खटला दाखल केला. या फॉरेन्सिक डेंटिस्टने आपल्या अहवालात दावा केला होता की, पीडितेच्या अंगावरील चाव्याच्या खुणा रॉबर्टच्या दातांच्या होत्या. राॅबर्टवरील गुन्हा चुकिचा असल्याचे सिद्ध झाल्यानंतर टँपा सिटी कौन्सिलने गुरुवारी (15 फेब्रुवारी 2024) अधिकृतपणे $14 दशलक्ष नुकसान भरपाई मंजूर केली.
कौन्सिल सदस्य लुईस व्हिएरा म्हणतात की, ही एक मोठी चूक होती आणि आशा आहे की या भरपाईमुळे रॉबर्टला थोडा दिलासा मिळेल. रॉबर्ट आणि त्याच्या फर्मला या वर्षी $9 दशलक्ष, पुढील वर्षी $3 दशलक्ष आणि नंतर 2026 मध्ये $2 दशलक्ष मिळतील. राॅबर्ट म्हणतो की, आता एकदा गेलेली वेळ तर पुन्हा येणार नाही. त्यामुळे त्याच्या मनात कोणाबाबतही कटूता नाही.