कैरो – लिबियामध्ये डॅनिएल वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा पूर आला आहे. या पूरामुळे पूर्वेकडील डेरना शहरात तब्बल 2 हजार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. लिबियालाच्या पूर्वेकडील भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे फुटली आणि लिबियाच्या पूर्वेकडील डेरना शहराचा सुमारे एक चतुर्थांश भाग वाहून गेला आाहे. डेरना शहर या पूराखाली चक्क गाडले गेले आहे. संपूर्ण शहराच्या आजूबाजूचा परिसर देखील पाण्याखाली गाडला गेला आहे.
इमारती पडल्यामुळे आणि पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे सुमारे 10 हजार जण बेपत्ता आहेत, अशी माहिती “इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस’ आणि “केड क्रेसेन्ट सोसायटीज’मधील लीबियाचे राजदूत तामर रामदान यांनी सांगितले. पूरामध्ये मरण पावणाऱ्यांचा आकडा प्रचंड आहे. ही संख्या काही हजारांपर्यंत जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी वर्तवली आहे. लीबियामध्ये अचानक आलेल्या या महापुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती मोरोक्कोमधील भूकंपाइतकीच गंभीर आहे, असेही त्यांनी सांगितले.
दोन धरणे एकापाठोपाठ एक करून फुटल्यामुळे पाण्याचे दोन मोठे प्रवाह आले होते. डेरना येथील आपत्ती रोखणे आपल्या सरकारसाठी केवळ अशक्य होते, असेही त्यांनी सांगितले. लीबियामध्ये एक दशकभरापासून अराजक स्थिती होती. त्यानंतर पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये देशाचे प्रशासन परस्पर भिन्न गटांच्या ताब्यात आहे. दोन्ही गटांना सशस्त्र गट आणि परदेशांचा पाठिंबा आहे. यामुळे देशाची साधन संपत्तीची व्यवस्था कोसळली असून आता पायाभूत सुविधा अपुऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे पुरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचाव कार्यात सुसुत्रता नाही, असे ‘रेड क्रेसेन्ट’ने म्हटले आहे.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 300 जणांचे मृतदेह सापडले आहेत. चिखलामध्ये आणखीन कितीतरी जणांचे मृतदेह गाडले गेले असण्याची किंवा पुराच्या पाण्याबोबर समुद्रामध्ये वाहून गेले असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांनी एकाच दफनभूमीमध्ये किमान 200 मृतदेहांचे सामुदायिक दफन केले आहे. मात्र अजूनही शेकडो मृतदेह दफनविधीच्या प्रतिक्षेत आहेत. ज्या इतर शहरांना वादळाचा फटका बसला त्यात सुसा, मार्ज आणि शहाट्ट यांचा समावेश आहे. शेकडो कुटुंबे विस्थापित झाली असून त्यांनी बेनगाझी शहरात आणि पूर्व लीबियातील शाळा आणि इतर सरकारी इमारतींमध्ये आश्रय घेतला आहे.