नारायण सातपुते
रेठरे बुद्रुक -महापुरात होणाऱ्या रोड ब्लॉकेजवर संशोधन करीत असलेले रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील आरिफ यासीन मुजावर यांनी “रोड ब्लॉकेज इन फ्लूड कंडिशन’ या विषयावरती तीन वेगवेगळे संशोधन पर रिसर्च निबंध लिहिले आहेत. ते आयआरजेइटी या आंतरराष्ट्रीय जरनलने प्रकाशित झाले आहेत. त्यांचा हा रिसर्च विद्यार्थी व संबंधित बाबींवर काम करणाऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरला असून त्यांनी सुचवलेल्या छोट्या छोट्या आणि घरगुती उपायांमुळे महापुरातून आपला बचाव करणे आता शक्य होणार आहे.
रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील आरिफ यासीन मुजावर हे सिव्हिल क्षेत्रात अफॉरडेबल हौसिंग सिस्टीम (परवडणारी घरे) असे नवनवीन उपक्रमावर काम करीत आहेत. जेणेकरून गोरगरीब लोकांना देखील चांगली घरे बांधता येतील. जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्यांनी सिव्हिल पदवी घेऊन ते पुढें मास्टरेट पदवीचे शिक्षण घेत संशोधन कार्य करीत आहेत.
पूर जन्यपरिस्थितीत रोड ब्लॉकेजला बरीचशी कारणे आहेत. यामध्ये स्ट्रक्चरल ड्रॉबॅकमुळे मोठी अडचण निर्माण होते. अशा दोन बाबींवर या शोध निबंधात माहिती देण्यात आली आहे. पुराच्या पाण्यापासून आपली घरे व दुकाने अगदी सोप्या पद्धतीने कशी वाचवता येतील. याविषयीवरील मुजावर यांचा संशोधनपर शोधनिबंध आयआरजेइटी या आंतरराष्ट्रीय जनरलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
मुजावर यांनी नाविन्याचा ध्यास बाळगत पुरावेळी होणारी हानी टाळण्यासाठी साध्या व सोप्या पद्धतीचा शोध निबंध तयार केला आहे. गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आलेल्या महापुरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजला होता. पुढील काळात अशा नैसर्गिक आपत्तीत गोरगरिबांच्या घराचे व मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यावर शोध निबंधातील उपाययोजना निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. दरम्यान, पुराचे पाणी घरात येऊन गेल्यानंतरही घराची साफसफाई व रोगराई थांबविण्यास या उपाय योजना कारगर ठरणार आहेत. ज्याठिकाणी घरे व दुकाने पाण्याखाली जातात, त्याठिकाणी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरणारी अशीच आहे.
अशा आहेत उपाय योजना…
आरिफ मुजावर यांनी सुचवलेल्या उपाययोजनात सर्वप्रथम आपल्या घरातील सांडपाणी व शौचालयाच्या पाईप सिलबंद करणे. नंतर पावसाचे पाणी गळू नये म्हणून जो प्लास्टिक कागद घरावर टाकला जातो. त्या कागदाने घराची खिडकी व दाराजवळील खिडकीच्या आकारापेक्षा दीड ते दोन फूट जादा प्लास्टिक कागद कापून घ्यावा. जेणेकरून जादा कापलेल्या भागाचे सर्व बाजूंनी फोल्डिंग अथवा रोल करता येईल. खिडकी पूर्णपणे सिलबंद करावी, रोल केलेल्या भागावर लाकडी पट्टया ठोकून घ्याव्यात. दाराच्या तळाचा भाग व्यवस्थितरीत्या सिलबंद करावा. आवश्यकतेनुसार चिकट्टेपचा वापर करावा तसेच त्यावर सुद्धा लाकडी पट्टी ठोकावी. प्लास्टिक कागद दार व खिडकी याला चिटकवून बसेल, अशा पद्धतीने लावावा. लाकडी पट्टीच्या खाली हिटलोन (एक प्रकारचा स्पंज) लावावा.