इस्लामाबाद – पाकिस्तानातील प्रस्थापित सरकारच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांमध्ये अग्रणी असलेले पत्रकार मतिउल्लाह जन हे इस्लामाबादेतून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी मुलाखतीचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये ते बेपत्ता झाले.
“एअर कंडिशनमध्ये बसून पाकिस्तानातील कायद्याबाबत चर्चा करणारे आणि त्याच्यावरची टीका म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन समजणाऱ्यांनी लक्ष द्यावे.’ असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मतिउल्लाह यांच्या मुलाने दुपारी 3.15 वाजता ट्विट करून आपले वडील बेपत्ता झाले असल्याचे जाहीर केले आहे.
” माझ्या वडिलांचे इस्लामाबादेतून अपहरण झाले असून त्यांना ताबडतोब शोधले गेले पाहिजे. त्यांच्या अपहरणामागे असलेल्यांना याबद्दल शिक्षा केली गेली पाहिजे. ‘ असेही त्यांच्या मुलाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मतिउल्लाह यांच्या बेपत्ता होण्याची दखल पाकिस्तानातील मानवी हक्क आयोगानेही घेतली आहे. मतिउल्लाह यांना सुरक्षितपणे शोधून काढले गेले पाहिजे, अशी मागणी आयोगाने पाकिस्तान सरकारकडे केली आहे.
फेब्रुवारीमध्ये अमेरिकेतील एनजीओ कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्टच्या मुलाखतीमध्ये मतिउल्लाह यांनी आपली व्यथा व्यक्त केली होती. लष्कराने सरकारविरोधात सातत्याने वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांच्या यादीत नाव आणि फोटो प्रसिद्ध केल्यापासून सरकारची आपल्यावर अवकृपा झाल्याचे त्यांनी या मुलाखतीत म्हटले होते.
प्रस्थापितांविरोधात वार्तांकन करणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांच्या जाहिराती सरकारकडून रोखल्या गेल्याचे अलिकडेच अमेरिकेतील एका वर्तमानपत्राने म्हटले होते.