सातारा, (प्रतिनिधी)- येथील प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयात नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या जयंतीनिमित्त नाट्यविषयक ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले होते किर्लोस्कर यांचे वारस नारायणराव किर्लोस्कर या कार्यक्रमाला उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन रंगकर्मी व प्रसिद्ध अभिनेते मकरंद गोसावी यांचे हस्ते करण्यात आले.
वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर, वैदेही कुलकर्णी, डॉ. राजेंद्र माने, सौ. जोत्स्ना कोल्हटकर, डॉ. श्याम बडवे, विजयराव पंडीत, रुपा मुळ्ये वगैरे मान्यवर उपस्थित होते. मकरंद गोसावी म्हणाले, या नगरवाचनालयात वाचन करत माझे सगळे लहानपण गेले.
त्यातूनच मला नाट्यविषयक, मालिकांविषयी गोडी लागली व आज माझ्यातला अभिनेता त्यामुळे प्रगल्भ झाला आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत नाटकाची एक समृद्ध परंपरा सुरू केली. त्यानंतर अनेक नाटक मंडळींनी हे संगीत नाट्य टिकवून ठेवले, असे डॉ. राजेंद्र माने यांनी प्रास्ताविकात सांगितले.
बालगंधर्व, दिनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले ते अगदी शिलेदार कंपनीपर्यंत नाट्यसंगीत आणि संगीत नाटके चांगल्या पद्धतीने सादर होत होती. अजूनही नाट्यपदे आवडीने ऐकली जातात, असे डॉ. मान यांनी सांगितले. वाचनालयाच्या कार्यवाह सौ. वैदही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्याम बडवे यांनी आभार मानले.