सणबूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा पाटण तालुक्यातील नवारस्ता येथील चौकामध्ये उभारणार असून हा पुतळा पाटण तालुक्याचे नवे आकर्षण ठरेल असा, अनोखा संकल्प लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान, हा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी लवकरच जिल्हयाचे पालकमंत्री ना. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यशराज देसाई म्हणाले, रयतेच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाटण तालुक्यात असावा आणि तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला शिवरायांच्या दर्शनाने सदैव प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात येणार आहे.
छत्रपती शिवरायांचे तेजस्वी व्यक्तित्व, त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, हीच यामागील प्रांजळ भावना आहे. लोकनेते यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया व छ. शिवाजी पार्क, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात पुढाकार घेतला होता. लोक्नेत्यांचा वारसा जपताना पाटण तालुक्यात शिवरायांचा कुठेही अश्वारुढ मोठा पुतळा नसल्याने तालुक्याची मध्यतर्वी बाजारपेठ असलेल्या नाडे-नवरस्ता येथे शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेअरमन देसाई यांच्या घोषणेमुळे जिल्हयातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.