कोल्हापूर – पाऊस सुरू असतानाच विजेचा गडगडाट होऊन थेट घरावर विज पडल्याची दुर्घटना नुकतीच खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथे घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र घरातील टीव्ही, मोबाईल या उपकरणांसह पूर्ण वायरिंग शॉर्ट होऊन खाक झाले तर स्वयंपाक घराच्या भिंतीला तडा जाऊन एकूण अंदाजे दीड ते दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, खिंडी व्हरवडे येथील कासार पानंद येथे सचिन पाटील यांनी नवीन घर बांधले आहे. ते पत्नी आणि दोन लहान मुलांसह येथे राहतात. मंगळवारी पाचच्या दरम्यान अचानक पाऊस आणि विजेचा गडगडाट सुरू झाला. त्याबरोबर विजेचा एक लोळ प्रचंड आवाज करत दरवाज्यातून थेट घरात आला.
स्वयंपाक घरातील उत्तर दिशेला दरवाजा बंद असल्याने हा लोळ स्वयंपाक घरातील भिंतीला छोटेसे भगदाड आणि मोठ्ठा तडा पाडून गेला. या दुर्घटनेत घरातील सर्व वायरिंग शॉर्ट झाले आणि टीव्ही जळाल्याने सुमारे दोन लाखांहून अधिक वित्तीय हानी झाली आहे.