Electric Shock: धक्कादायक घटना! इंद्रायणी नगरमध्ये उघड्या वीज डीपीने तरुणाला ओढले; वाचा नेमकं काय घडलं?
Electric Shock: इंद्रायणी नगर परिसरातील अनेक डीपींचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत; पावसाच्या पाण्यात शॉर्टसर्किट होऊन जीवितहानी होण्याचा मोठा धोका.

Electric Shock – इंद्रायणी नगर परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी वीज वितरणाच्या डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉइंट) उघड्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांसाठी हा जीवघेणा धोका ठरत असून संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन डीपी सुरक्षित कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
इंद्रायणी नगरमधील अनेक रस्त्यांच्या कडेला आणि वस्ती भागातील डीपी बॉक्सचे दरवाजे तुटलेले किंवा कायमस्वरूपी उघडे असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात या डीपीमध्ये पाणी साचत असल्याने विजेचा धक्का बसण्याचा किंवा करंट पसरण्याचा धोका वाढला आहे. दरम्यान, नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. मद्यधुंद अवस्थेतील एक तरुण उघड्या डीपीजवळ गेला असता तो त्यामध्ये ओढला गेला.
मात्र, परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेत त्या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरातील उघड्या डीपींचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या परिसरात अनेक शाळा असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करतात. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेल्या परिस्थितीत उघड्या डीपीमुळे विजेचा प्रवाह पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांनीही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, काही डीपी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहेत. पावसाळ्यात ओलसर वातावरणात उघडी विद्युत उपकरणे असल्याने शॉर्टसर्किट किंवा विजेचा धक्का बसण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे जीवितहानीसह मालमत्तेचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विद्युत डीपींना सुरक्षित कव्हर असणे अत्यावश्यक असून पावसाळ्यात अशा उपकरणांची नियमित तपासणी करून तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इंद्रायणी नगर परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत असून मूलभूत सुविधांवरील ताणही वाढत आहे. त्यामुळे संबंधित वीज वितरण विभागाने तातडीने सर्व उघड्या डीपींची पाहणी करून त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची जबाबदारी प्रशासनावर राहील, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.






