पिंपरी : मोहननगर येथील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या अपघातात दोन युवक विजेचा धक्का बसून जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार (दि. ५) रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास काली माता मंदिराजवळ, चिंचवड येथे घडली. जखमींमध्ये प्रवीण राजेंद्र कुटे (वय २१, रा. रामनगर, दत्तनगर, चिंचवड, पुणे) आणि अमोल सदाशिव चव्हाण (वय ३९, रा. इंद्रप्रस्थ हाउसिंग सोसायटी, क्रांतीनगर, आकुर्डी, पुणे) यांचा समावेश आहे. मिरवणुकीतील डीजे गाडी विजेच्या खांबाला धडकली, त्यामुळे इलेक्ट्रिक तार तुटून थेट त्यांच्या अंगावर पडली. यामध्ये दोघांनाही विजेचा जबर धक्का बसला. तत्काळ नागरिकांनी त्यांना निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रात्री ११ वाजता दोघांनाही अति दक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून ते बोलत आहेत. घटनास्थळी महावितरण अधिकारी भोसरी व त्यांचा स्टाफ तातडीने दाखल झाला. त्यांनी तत्काळ तुटलेल्या तारांची दुरुस्ती करून धोका टाळला. या अपघातामुळे मिरवणुकीत काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.