Electric Shock Death : काळजाचा थरकाप! घोडनदीवर वीजपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Electric Shock Death : वीजपंप सुरू करण्यासाठी घोडनदीवर गेलेल्या शेतकरी तरुणाचा वीज वाहक खांबाच्या तारेला विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Electric Shock Death – वीजपंप सुरू करण्यासाठी घोडनदी गेलेल्या शेतकरी तरुणाचा वीज वाहक खांबाच्या तारेला विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रकांत मारुती पिंगळे (वय 34) असे विजेचा धक्का बसून मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून ही घटना श्री क्षेत्र वडगाव-काशिंबेग येथील घोडनदीच्या काठावर घडली.
मंचर येथील श्री कुलस्वामी पतसंस्थेत काम करणारा चंद्रकांत पिंगळे हा तरुण घरची शेती स्वतः करत होता. घोडनदीवरून त्याने वीज पंपाद्वारे शेतीसाठी पाणी पिंगळेमळा येथील शेतात नेला आहे. रविवारी सुट्टी असल्याने सकाळी साडेदहा वाजता तो वीजपंप सुरू करण्यासाठी घोडनदीच्या काठावर गेला होता. त्यावेळी तेथे विलास बोर्हाडे व इतर शेतकरी तेथे होते.
वीज पंप सुरू करण्यासाठी तो नदीच्या काठावर गेला असता तेथे असलेल्या वीज वाहक खांबाच्या तारेला विद्युत प्रवाह आल्याने त्याचा धक्का चंद्रकांत पिंगळे याला बसला. या धक्क्याने तो घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यातील पाण्यात फेकला गेला. आवाजाने बाजूचे शेतकरी धावत आले. त्यांना चंद्रकांत पिंगळे हा पाण्यात पडलेला दिसला.
फोनवरून मदत बोलवण्यात आली. पोलीस पाटील निखिल तारू, श्रीराम डोके, वैभव चव्हाण, शरद लोखंडे, किशोर टेके, संजय काळे, महेश डोके, बाळासाहेब शिंदे आदींनी तातडीने चंद्रकांत पिंगळे याला पाण्याच्या बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे.
चंद्रकांत पिंगळे हा एक होतकरू तरुण होता. या संदर्भात संतोष बबन पिंगळे यांनी मंचर पोलिसात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी नोंद घेतली आहे. पिंगळे याच्या डाव्या हाताच्या बोटाला विजेचा धक्का बसल्याने भाजले होते. मंचर पोलीस पुढील तपास करत आहे.
वडिलांचा सर्पदंशाने मृत्यू
वीस वर्षांपूर्वी शेतात काम करत असताना त्याचे वडील मारुती पिंगळे सर्पदंश होऊन मरण पावले होते. त्यानंतर कुटुंबाचा भार त्याच्या खांद्यावर आला होता. गणेश जयंतीला त्याने नवीन चारचाकी गाडी घेतली होती. त्याच्या पश्चात आई, पत्नी, आठ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.





