पालघर : पक्ष फोडाफोडीच्या कथित नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजपवर पहिल्यांदाच नाव न घेता प्रहार केल्याचं दिसून आलं आहे. डहाणूमध्ये “आपण अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत, रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती,” असे सूचक विधान करून शिंदे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. डहाणू नगरपरिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या विरोधात ठाकरेसेना आणि काँग्रेसने माघार घेतल्याने आता शिंदे गट विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. भाजपच्या उमेदवाराविरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधल्याने या संघर्षाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये भाजपकडून शिंदे गटातील कार्यकर्त्यांना फोडलं जात असल्याची चर्चा आहे. याच नाराजीतून शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन गाऱ्हाणं मांडल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीनंतरही त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचं चित्र आहे. पाटण्यात नितीशकुमारांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे वेगवेगळ्या मार्गाने पोहोचले आणि भेटीदरम्यानही त्यांच्यात कोरडेपणा दिसून आला. दरम्यान, कल्याण डोंबिवलीपाठोपाठ धाराशिवमध्येही सेना-भाजपमध्ये तणाव वाढला आहे. धाराशिवमध्ये एका विवाह सोहळ्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट टाळल्याची चर्चा आहे, ज्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचं स्पष्ट होत आहे. भाजप-शिवसेनेतील हा तणाव आता डहाणूच्या निवडणुकीच्या निमित्ताने अधिक उघड झाला असून, भाजप यावर काय उत्तर देणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.