Amit Shah | Priyank Kharge – अमित शहा हे कदाचित स्वतंत्र भारताचे सर्वात निष्क्रिय गृहमंत्री आहेत. जर ते इतर कोणत्याही देशात किंवा राज्यात असते तर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले गेले असते. पण ते पंतप्रधान मोदींचे विश्वासू आहेत. म्हणून ते सुरक्षित आहेत. या सगळ्या स्फोटांप्रकरणी केंद्रिय गृहमंत्र्यांना जबाबदार का धरले जात नाही? शहा फक्त सरकार पाडण्यासाठी आणि राजकारण खेळण्यासाठी आहेत का? त्यांच्या अक्षमतेमुळे आणखी किती जीव जातील, अशा शब्दांत कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले आहे. तृणमूल काॅंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी केंद्र सरकारवर निष्काळजीपणा आणि अपयशाचे गंभीर आरोप केले आहेत. महुआ मोईत्रा लिहितात की, भारताला पूर्णवेळ द्वेष प्रचार मंत्री नको आहे तर एका सक्षम गृहमंत्र्यांची गरज आहे. अमित शहांची कर्तव्यतत्परता काय आहे? देशाच्या सीमा आणि राजधानी दोन्हीचे रक्षण करण्यात ते का अपयशी ठरत आहेत? या घटनेमुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी दिल्लीत झालेल्या स्फोटावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, सरकार दावा करते की देशात घुसखोर येत नाहीत. मग अशा घटना कशा घडत आहेत? काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये आमच्या मुलांना मारण्यात आले. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी पुलवामामध्येही हल्ला झाला होता, परंतु आजपर्यंत कोणताही तपास झालेला नाही. संपूर्ण देशात तणावाचे वातावरण आहे आणि अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गृहमंत्री अमित शहा या घटनेसाठी जबाबदार आहेत. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि घरी जावे. देश अपघातांनी ग्रासलेला असताना गृहमंत्री निवडणुकांमध्ये व्यस्त होते. हे सरकारचे अपयश आहे. लोकांना उत्तर द्यावे लागेल दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आणि म्हटले की जर आपली राजधानी दिल्ली सुरक्षित नसेल तर ५६ इंचाच्या लोकांना उत्तर द्यावे लागेल. आम्हाला राजकारण करायचे नाही, परंतु हे सरकार देशाला सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर काँग्रेस नेहमीच स्पष्ट राहिली आहे. पहलगाम घटनेदरम्यान राहुल गांधी यांनीही म्हटले होते की, आम्ही सरकारसोबत उभे आहोत, परंतु आता भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’च्या नावाखाली घटनेचे राजकारण करत आहे.