मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महायुतीत तणाव वाढला असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत महायुतीतील वाद, पक्षप्रवेश आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली असल्याचे सूत्र सांगत आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत बहिष्कार टाकला होता, तर भाजपकडून शिवसेना नेत्यांना पक्षात सामावण्याच्या प्रयत्नांमुळे असंतोष वाढला आहे. या भेटीनंतर शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, मी रडणारा नाही, तर लढणारा आहे. शिंदे यांनी आज (१९ नोव्हेंबर) रोजी दिल्लीत अमित शाह यांची सुमारे पाऊण तास चर्चा केली. यात स्थानिक निवडणुकांतील महायुतीतील खटाटोप, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरील तक्रारी आणि ऑपरेशन लोटससाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून नेते फोडण्याच्या आरोपांवर भाष्य करण्यात आले. शिंदे यांनी शाह यांना महायुतीतील नेत्यांच्या भूमिकांबाबत खंत व्यक्त केली आणि युतीचे वातावरण दूषित होत असल्याचे सांगितले. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजप-एनडीएच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्याच्या निमित्ताने ही भेट असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “मी तक्रारीचा पाढा वाचणारा नाही. मी आत बसलोय आणि बाहेर तुम्ही बातम्या सुरू करता. महायुतीत मतभेद होणार नाहीत, याची प्रत्येक पक्षाने काळजी घ्यावी,” असे ते म्हणाले. शाह भेटीत शिंदे यांनी मांडले हे मुद्दे शिवसेना नेत्यांच्या पक्षप्रवेशांमुळे महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याची तक्रार शिंदे यांनी केली. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर स्थानिक निवडणुकांसाठी पोषक वातावरण असताना, काही नेते वैयक्तिक स्वार्थासाठी ते खराब करत असल्याचे त्यांनी सांगितले. “मीडियात उलटसुलट बातम्या येत आहेत, ज्यामुळे जनमानसात संभ्रम पसरतोय. युतीतील नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळावी आणि संयम व सामंजस्य बाळगावे,” असे मुद्दे त्यांनी मांडले. विरोधकांना याचा फायदा होत असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. या भेटीनंतर शिंदे बिहार शपथविधी सोहळ्यासाठी रवाना होणार आहेत. मुंबईत फडणवीस-अजित पवारांची बैठक शिंदे दिल्ली रवाना झाल्याच कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यात शिंदे गटातील मंत्र्यांची वाढती नाराजी दूर करण्यावर चर्चा झाली. शिंदे यांच्या नाराजीने महायुतीतील तीन पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे उघड झाले आहे. “शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीला बहिष्कार टाकला, तर भाजपकडून ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांना पक्षात सामावण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती सूत्रांनी दिली.