मुंबई – शिवसेना-भाजप युतीचे सरकार लवकरच इंधनावरील व्हॅट कमी करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यात इंधनावरील व्हॅट कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना बसत असलेल्या आर्थिक फटक्यातून थोडा दिलासा मिळणार आहे.
विधीमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यावेळी सभागृहात एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. एकनाथ शिंदे म्हणाले, जागतिक बाजार पेठेत तेलाच्या किंमती वाढल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कर कमी केला होता. त्यावेळी त्यांनी इतर राज्यांनाही व्हॅट कमी करण्याची विनंती केली होता. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता. पण महाराष्ट्राने व्हॅट कमी केला नव्हता. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हॅट कमी करून सर्वसामन्यांना दिलासा देण्याचे काम आमचे युतीचे सरकार करेल. तसेच, या राज्यातील महत्वाचा घटक असलेला बळीराजासाठी हे सरकार एवढे करेल की शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आम्ही करू. त्याकरीता विरोधीपक्षाचे आणि इतरांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लागेल. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी असे आपण दोन्ही पक्ष एकत्र येऊन शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवू, असेही त्यांनी म्हटले.
हिरकणी गावासाठी 21 कोटी
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. तसेच शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. जलयुक्त शिवार सारथे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.